कानपुर :- बांगलादेशचा स्टार अष्टपैलू खेळाडू असलेल्या शाकिब-अल-हसनने भारतासमोर खेळणे आव्हानात्मक असलेल्याचे सांगताना भारताच्या खेळाडूंच्या गुणवत्तेसमोर खेळपट्टी हा गौण विषय असल्याचे मान्य केले. २००० साली ढाका येथे दोन्ही संघ पहिल्यांदा आमनेसामने आले होते. त्यानंतर अजून एकदाही बांगलादेश संघाला भारतासमोर कसोटी लढतीत विजय मिळवता आला नाही. दोन्ही संघ १४ वेळा आमनेसामने आले आहेत, त्यापैकी १२ लढती भारताने जिंकल्या असून २ लढती अनिर्णित अवस्थेत राहिल्या आहेत. इतर देशांकडे पहिले असता ते एक-दोन सामन्यांमध्ये पराभव स्वीकारतील. मात्र भारताच्या बाबतीत हे लागू होत नाही. आम्ही बांगलादेशात भारताविरुद्ध एकदिवसीय मालिका जिंकलो होतो. मात्र कसोटीमध्ये चांगला खेळ करून देखील आम्हाला विजयाने हुलकावणी दिली. उद्याच्या लढतीत देखील आम्हाला संधी असणार असल्याचे शाकिबने बोलताना सांगितले. भारताच्या मालिकेपूर्वी बांगलादेश संघाने पाकिस्तान विरुद्धची मालिका २-० अशी जिंकली होती. त्यामुळे बांगलादेशच्या खेळाडूंचा आत्मविश्वास वाढला होता. पाकिस्तान संघ तुलनेने नवीन आहे. तुम्ही पाकिस्तान आणि आमच्या संघाकडे पाहिले तर सध्याच्या घडीला आमच्याकडे त्यांच्यापेक्षा जास्त अनुभव आहे, असे शाकिब बोलताना म्हणाला. खेळपट्टीने विशेष फरक पडत नाही जेव्हा तुम्ही भारत, ऑस्ट्रेलिया, इंग्लंड संघाविरुद्ध खेळात असता, तेव्हा खेळपट्टीचा फारसा फरक पडत नाही. या संघाकडे दर्जेदार फिरकी, वेगवान गोलंदाज आहेत. दर्जेदार फलंदाज आहेत, ते कोणत्याही खेळपट्टीवर धावा करू शकतात. त्यामुळे या संघांना खेळपट्टीने विशेष काही फरक पडत नसल्याचे शाकिबने बोलताना सांगितले. अचानक घेतली निवृत्ती… भारताविरुद्धच्या दुसऱ्या कसोटीच्या पूर्वसंध्येला झालेल्या पत्रकारपरिषदेमध्ये शाकिबने अचानक निवृत्ती जाहीर केली. शाकिबने २००७ साली बांगलादेश संघासाठी पहिला कसोटी सामना खेळाला होता. शाकिबने बांगलादेश संघासाठी ६९ कसोटी लढती खेळताना ४४५३ धावा व २४२ बळी घेतले आहेत. मी शेवटची कसोटी मीरपूरमध्ये खेळण्याची इच्छा बीसीबीकडे व्यक्त केली आहे. बीसीबीने असहमती दर्शविल्यास उद्यापासून सुरु होणारा माझा शेवटचा सामना असल्याचे शाकिबने बोलताना सांगितले. बांगलादेशमध्ये राजकीय अशांतता निर्माण झाली होती. त्यावेळी एका खुनाच्या प्रकरणात शाकिबचे नाव समोर आले होते. शाकिब-अल-हसनची कामगिरी खालीलप्रमाणे… कसोटी : एकदिवसीय : टी-२० सामने : ७० : २४७ : १२९ धावा : ४६०० : ७५७० : २५५१ शतके : ५ : ९ : ० अर्धशतके : ३१ : ५६ : १३