IND vs BAN 2nd T20 : मालिका विजयासाठी टीम इंडिया सज्ज, बांगलादेशपुढं बरोबरी साधण्याचे आव्हान…

IND vs BAN 2nd T20 :- पहिल्या लढतीतील मोठ्या विजयाने उत्साही झालेला भारतीय संघ आज (बुधवार,दि.9) होणाऱ्या दुसऱ्या टी-20 लढतीमध्ये आपले वर्चस्व कायम राखण्यासाठी मैदानात उतरणार असून बांगलादेश संघ देखील मालिका जिवंत ठेवण्यासाठी प्रयत्नशील असणार आहे. मात्र, भारतीय संघाने कर्णधार सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखाली ज्या प्रकारे पहिला सामना जिंकला, त्यावरून बांगलादेश संघासाठी विजय मिळविणे मोठे आव्हान असणार आहे. वरिष्ठ खेळाडू विश्रांती घेत असून देखील पहिल्या लढतीत गाजविलेले वर्चस्व हे मर्यादित षटकांच्या क्रिकेटमध्ये असलेली भारताची बेंच स्ट्रेंथ मजबूत असल्याचाही दिसून आले आहे.
सॅमसनवरचा विश्वास…
आयपीएल मधून पुढे आलेल्या संजू सॅमसनला अजूनही संघामध्ये कायमस्वरूपी जागा बनविता आली नाही. त्यामुळे या मालिकेत यष्टिरक्षक फलंदाज संजू सॅमसन चमकदार कामगिरी करण्यासाठी उत्सुक असणार आहे. 2015 साली पदार्पण केल्यानंतर त्याच्या कामगिरीत सातत्य नसल्याचा फटका त्याला अनेकादा बसला आहे. त्यामुळे तो सातत्याने संघामध्ये राहू शकला नाही. सॅमसन मधल्याफळीत फलंदाजी करत असला तरी यावेळी कर्णधार सूर्यकुमार यादवने पहिल्या समानयामध्ये त्याला सलामीवीरांची भूमिका दिली होती. त्याने आक्रमक फलंदाजी करताना 19 चेंडूत 29 धावा केल्या होत्या. त्यामुळे कर्णधार सूर्यकुमार यादवने सोपविलेली जबाबदारी चांगल्याप्रकारे पार पाडण्यासाठी सॅमसनला मेहनत करावी लागणार आहे. याचबरोबरीने दुसरा सलामीवीर अभिषेक शर्माला देखील संजू सॅमसनच्या सोबतीने मोठी सलामी द्यावी लागणार आहे. यशस्वी जैस्वाल व शुभमन गिल या दोघांना विश्रांती दिल्याने या दोघांना मालिकेत संधी मिळाली आहे.
संघ कायम राहण्याची शक्यता…
पहिल्या सामना सहज जिंकल्यामुळे संघामध्ये बदल होण्याची शक्यता अतिशय कमी आहे. पहिल्या सामन्यातून पदार्पण करणारे मयांक यादव व अष्टपैलू नितीशकुमार रेड्डी यांनी ग्वाल्हेरमध्ये आपली छाप सोडली होती. अर्शदीपने देखील वेगवान गोलंदाजीची धुरा योग्यपणे सांभाळली. फिरकीपटू असलेल्या वरुण चक्रवर्तीने देखील चांगली गोलंदाजी करून यशस्वी पुनरागमन केले आहे. रवींद्र जडेजाने टी-२० मधून निवृत्ती घेतल्यानंतर वॉशिग्टन सुंदर देखील अष्टपैलू खेळाडू म्हणून उदयास येण्यास इच्छूक आहे.
अडखळलेले बांगलादेशी वाघ…
बांगलादेश संघाचा विचार करताना, कसोटी मालिका गमावल्यानंतर पहिल्या टी-२० सामना देखील गमावला आहे. पहिल्या सामन्यात बांगलादेशी वाघ भारतीय वेगवान माऱ्यासमोर अडखळले होते. त्यामुळे त्यांना संधी असून देखील धावांचा पाठलाग करता आला नाही. मालिका जिवंत ठेवायची असल्यास बांगलादेश संघाला चांगली कामगिरी करावीच लागणार आहे. कर्णधार शांतोने सामन्यानंतर १८० पेक्षा जास्त धावा कशा करायच्या हे आमच्या फलंदाजांना माहिती नव्हते, अशी स्पष्ट कबुली दिली. असे असले तरी बांगलादेश संघ पुनरागमन करण्यासाठी सक्षम असल्याचे देखील कर्णधार नझमुल हुसेन शांतोने सांगितले आहे.
Irani Cup 2024 : अजिंक्य रहाणेच्या मुंबई संघावर पैशांचा पाऊस, MCA ने केली मोठी घोषणा…
संघ पुढील प्रमाणे :
भारत : सूर्यकुमार यादव (कर्णधार), अभिषेक शर्मा, संजू सॅमसन (यष्टिरक्षक), रिंकू सिंग, हार्दिक पंड्या, रियान पराग, नितीश कुमार रेड्डी, तीलक वर्मा, वॉशिंग्टन सुंदर, रवी बिश्नोई, वरुण चक्रवर्ती, जितेश शर्मा (यष्टिरक्षक), अर्शदीप सिंग, हर्षित राणा, मयंक यादव.
बांगलादेश : नजमुल हुसेन शांतो (कर्णधार), तन्झीद हसन तमीम, परवेझ हुसैन इमॉन, तौहीद ह्रदॉय, महमूद उल्लाह, लिटन दास, जाकर अली अनिक, मेहदी हसन मिराज, महेदी हसन, रिशाद हुसेन, मुस्तफिजुर रहमान, तस्किन अहमद, शरीफुल इस्लाम, तस्किन अहमद, शरीफुल इस्लाम. हसन साकिब, रकीबुल हसन.





