Ind vs Aus 5th Test: भारतीय गोलंदाजांची शानदार कामगिरी, पहिल्या डावात ऑस्ट्रेलियाला 181 धावांवर रोखले

India vs Australia 5th Test Day 2: भारत आणि ऑस्ट्रेलियामध्ये सुरू असलेल्या सिडनी कसोटीच्या दुसऱ्या दिवशी भारतीय गोलंदाजांनी शानदार कामगिरी केली. भारतीय गोलंदाजांना ऑस्ट्रेलियाला पहिल्या डावात 181 धावांवर रोखण्यात यश आले आहे. यासोबतच, भारतीय संघाने सामन्यात आघाडी देखील घेतली आहे.
पहिल्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा भारताने सर्व विकेट्स गमावत 185 धावा केल्या होत्या. त्यानंतर मैदानात उतरलेल्या ऑस्ट्रेलिया संघाने 1 विकेट गमावत 9 धावा केल्या होत्या. दुसऱ्या दिवशी मात्र ऑस्ट्रेलियाच्या संघाला फारशी चांगली कामगिरी करता आली नाही. भारतीय गोलंदाजांनी शानदार कामगिरी करत ऑस्ट्रेलियाला 181 धावांवर रोखत आघाडी घेतली आहे.
ऑस्ट्रेलियाकडून फलंदाजी करताना पहिल्या डावात ब्यू वेबस्टरने सर्वाधिक 57 धावा केल्या. तर खालोखाल स्टीव्ह स्मिथने 33 धावा, सॅम कॉन्स्टासने 23 धावा आणि अॅलेक्स कॅरीने 21 धावांची खेळी केली. ऑस्ट्रेलियाच्या इतर खेळाडूंना मोठी खेळी करता आली नाही.
भारताकडून मोहम्मद सिराज आणि प्रसिद्ध कृष्णाने प्रत्येकी 3 विकेट्स घेत चमकदार कामगिरी केली. तर कर्णधार जसप्रीत बुमराह आणि नितीश कुमार रेड्डीने प्रत्येकी 2 विकेट्स घेतल्या.
दरम्यान, सामन्याच्या दुसऱ्या दिवशी या सीरिजमधील भारताचा सर्वात यशस्वी गोलंदाज असलेल्या जसप्रीत बुमराहला अचानक मैदान सोडावे लागले. दुसऱ्या दिवशी लंचब्रेकनंतर केवळ एक ओव्हर टाकून त्याने मैदान सोडले. यामुळे त्याला दुखापत झाली असण्याची शक्यता वर्तवली जात आहे. बुमराहने अचानक मैदान सोडल्यानंतर कर्णधारपद विराट कोहलीकडे सोपवण्यात आले.
बुमराहला दुखापत झाली असल्यास हा भारतासाठी मोठा धक्का ठरू शकतो. भारताच्या विजयासाठी दुसऱ्या डावात बुमराहने गोलंदाजी करणे महत्त्वाचे असणार आहे.





