IND A vs SA A 2nd Unofficial Test Highlights : भारत ‘अ’ आणि दक्षिण आफ्रिका ‘अ’ संघांदरम्यान बंगळुरू येथील बीसीसीआय सेंटर ऑफ एक्सलन्स ग्राउंड एकवर खेळल्या गेलेल्या दुसऱ्या अनधिकृत कसोटी सामन्यात भारतीय संघाला दारुण पराभवाचा सामना करावा लागला आहे. मायदेशातील खेळपट्टीवर शेवटच्या डावात ४०० हून अधिक धावांचे लक्ष्य देऊनही भारतीय गोलंदाज ते वाचवण्यात अपयशी ठरले. सिराज, आकाश, कुलदीप आणि प्रसिद्ध यांसारखे स्टार गोलंदाज संघात असूनही, दक्षिण आफ्रिकेच्या फलंदाजीपुढे ते निष्प्रभ ठरले आणि भारताला ५ गडी राखून पराभव पत्करावा लागला. ध्रुव जुरेलच्या दोन शतकांवर फेरलं पाणी – या सामन्यातील भारताच्या पहिल्या डावात यष्टीरक्षक फलंदाज ध्रुव जुरेलची नाबाद १३२ धावांची शानदार शतकी खेळी वगळता अन्य कोणताही फलंदाज ३० धावांचा आकडा गाठू शकला नाही आणि संघाने २५५ धावा केल्या होत्या. मात्र, गोलंदाजांनी पुनरागमन करत दक्षिण आफ्रिकेचा पहिला डाव २२१ धावांवरच रोखला. ज्यामध्ये प्रसिध कृष्णाने ३ विकेट्स घेतल्या, तर आकाश दीप आणि मोहम्मद सिराजने प्रत्येकी २ विकेट्स घेतल्या. कुलदीप यादव आणि हर्ष दुबे यांना प्रत्येकी १-१ विकेट्स घेतली. पहिल्या डावात ३४ धावांची महत्त्वपूर्ण आघाडी मिळाल्यानंतर भारताने दुसऱ्या डावात ७ गडी गमावून ३८२ धावांवर डाव घोषित केला. या डावातही ध्रुव जुरेलने आपला दमदार फॉर्म कायम ठेवत नाबाद शतकी (१२७) खेळी साकारली. त्याला हर्ष दुबे (८४ धावा) आणि कर्णधार ऋषभ पंत (६५ धावा) यांनी चांगली साथ दिली. यामुळे दक्षिण आफ्रिकेसमोर विजयासाठी ४१७ धावांचे मोठे लक्ष्य उभे राहिले. हेही वाचा – Akash Kumar Choudhary : मेघालयाच्या पठ्ठ्याचा वर्ल्ड रेकॉर्ड! सलग ८ षटकार मारत अवघ्या ११ चेंडूत ठोकलं अर्धशतक, पाहा VIDEO ४१७ धावांचे लक्ष्य आफ्रिकेने सहज गाठले – भारतासारख्या खेळपट्टीवर चौथ्या डावात ४१७ धावांचे लक्ष्य गाठणे जवळजवळ अशक्य मानले जाते, पण दक्षिण आफ्रिकेच्या फलंदाजांनी हा चमत्कार करून दाखवला. त्यांनी केवळ ५ गडी गमावून हे लक्ष्य यशस्वीरित्या पूर्ण केले.जॉर्डन हरमन (९१) आणि लेसेगो सेनोक्वाने (७७) यांनी संघाला उत्कृष्ट सुरुवात करून दिली. यानंतर मधल्या फळीत जुबैर हमजा (७७) आणि टेम्बा बावुमा (५९) यांनी विजयाच्या आशा जिवंत ठेवल्या. त्यानंतर कॉनर एस्टरहुइजनने नाबाद ५२ धावांची खेळी साकारत संघाला विजय मिळवून दिला. हेही वाचा – Hong Kong Super Sixes : हाँगकाँग सुपर सिक्सेसमध्ये भारत सुपर फ्लॉप! पाकिस्तानने पटकावलं जेतेपद भारताचे स्टार गोलंदाज ठरले फ्लॉप – आपल्या ४१७ धावांच्या लक्ष्याचा बचाव करताना भारतीय गोलंदाज पूर्णपणे अपयश ठरले. मोहम्मद सिराज आणि आकाश दीप यांना प्रत्येकी एकच विकेट मिळाली. प्रसिध कृष्णाने २ विकेट्स घेतल्या, पण कुलदीप यादवला एकही विकेट मिळाली नाही. परिणामी, भारतीय ‘अ’ संघाला ५ गडी राखून पराभवाचा सामना करावा लागला.