देशात सर्व्हिस अपार्टमेंटची संकल्पना जवळपास दहा ते बारा वर्षांपासून कोणत्या ना कोणत्या स्वरूपात दिसून येत आहे. सर्व्हिस अपार्टमेंटची संकल्पना मेट्रो आणि मोठ्या टायर 2 शहरात विशेषतः ज्या ठिकाणी महागडे हॉटेल्स आहेत, तेथे चांगल्या रीतीने अंमलात आणली जात आहे. कॉर्पोरेट हॉस्पिटॅलिटी सेक्टरमध्ये सर्व्हिस अपार्टमेंट हा एक वाढणारा ट्रेंड मानला जात आहे. देश-विदेशातील कंपन्या आपल्या उच्चपदस्थ अधिकाऱ्यांना विविध शहरात दौऱ्यावर, भेटीवर पाठवत असतात. अशावेळी त्यांच्या राहण्याची व्यवस्था हॉटेलवर किंवा कंपनीच्या गेस्टहाऊसवर केली जाते. अर्थात, प्रत्येकवेळी अशा प्रकारचा खर्च करणे कंपनीला परवडत नाही. अधिकाऱ्याचा मुक्काम किती दिवस असतो, यावर खर्च अवलंबून असतो. जर दीर्घकाळ राहिल्यास कंपनी हॉटेलचा खर्च सहन करू शकत नाही. म्हणूनच टू स्टार किंवा फोर स्टार हॉटेलसारखी सुविधा देणारे आणि योग्य लोकेशनला असलेले सर्व्हिस अपार्टमेंट हा एक चांगला पर्याय ठरू शकतो.
सर्व्हिस अपार्टमेंट व्यवसायाचे यश हे व्याप्तीवर अवलंबून आहे. याचाच अर्थ एका ब्रॅंडअंतर्गत सुविधा देताना पुरेशा प्रमाणात फ्लॅटस उपलब्ध असणे गरजेचे आहे. त्यात हॉटेलच्या खोल्याप्रमाणे सोयी असणे अपेक्षित असते. त्यामुळे एखाद्या व्यावसायिक प्रॉपर्टी मॅनेजमेंट एजन्सीकडे अशा प्रकारचे काम सोपविता येऊ शकते. साहजिकच लोकेशनच्या दृष्टीने सर्व्हिस अपार्टमेंटस कंपन्यांसाठी उपयुक्त ठरले आहेत. सध्याच्या काळात बंगळुरू, मुंबईसारख्या शहरात सर्व्हिस अपार्टमेंटला मोठी मागणी आहे. पुणे, दिल्ली, चेन्नई, हैदराबाद, गोवा, हिमाचल प्रदेश आणि केरळसारख्या पर्यटनस्थळी सर्व्हिस अपार्टमेंट्स दिसून येत आहेत.
सर्व्हिस अपार्टमेंटची गुणवत्ता आणि सुविधांची अनेक पातळीवर विभागणी करता येऊ शकते. त्यानुसार महसुलात कमी-जास्त फरक पडतो. सर्व्हिस अपार्टमेंट्सचे भाडे हे जागा, सुविधा आणि स्थान यावर अवलंबून असते. थ्री स्टारच्या तुलनेत वीस ते तीस टक्के कमी दरात अपार्टमेंट उपलब्ध करून दिल्यास लोकप्रियता तुलनेने लवकर वाढू शकते. साधारणपणे ब्रॅंडेड तसेच लोकप्रिय सर्व्हिस अपार्टमेंट हे व्यक्तिगत किंवा लहान पातळीवर काम करणाऱ्या सर्व्हिस अपार्टमेंटच्या तुलनेत चांगले ठरू शकतात. ब्रॅंडेड सुविधा देणाऱ्यांना या व्यवसायाची चांगली माहिती असते आणि ते काम करण्यासाठी योग्य स्रोतांचा शोध घेतात.
सर्व्हिस अपार्टमेंट्सचा वाढता ट्रेंड (भाग-२)
एक सर्व्हिस अपार्टमेंट पूर्णपणे सुसज्ज असणे अपेक्षित आहे. त्यात टीव्ही, फ्रीज, एसी सुविधा याशिवाय एक कर्मचारी, हाऊसकिंपिंग करणारा कर्मचारीवृंद, लॉंड्री स्टाफ सेवा असणे आवश्यक आहे. याशिवाय ब्रेकफास्टची देखील सुविधा असल्यास नियमितपणे चांगले उत्पन्न मिळू शकते.
– कमलेश गिरी