परदेशी गुंतवणूकदारांकडून वाढली विक्री; सलग दुसर्या दिवशी शेअर बाजार निर्देशांकात घट

मुंबई : अमेरिकेने अनेक देशाविरुद्ध सुरू केलेले व्यापार युद्ध आणखी चिघळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्याचबरोबर रशिया- युक्रेन युद्ध वाढत चालले आहे. याचा परिणाम जागतिक चलन बाजाराबरोबरच शेअर बाजारावरही होत आहे. यामुळे सलग दुसर्या दिवशी परदेशी संस्थागत गुंतवणूकदारांनी विक्री केल्यामुळे शेअर बाजाराचे निर्देशांक कमी झाले.
बाजार बंद होताना मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स 636 अंकांनी कमी होऊन 80,737 अंकावर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टी 174 अंकांनी म्हणजे 0.70 टक्क्यांनी कमी होऊन 24, 542 अंकावर बंद झाला. मुंबई शेअर बाजारावर नोंदलेल्या 1,731 कंपन्यांच्या शेअरच्या भावात वाढ झाली तर 2,266 कंपन्यांच्या शेअरच्या भावात घट झाली.
डॉलर कमकुवत होऊनही एकूण जागतिक परिस्थिती खराब होत चालल्यामुळे परदेशी संस्थागत गुंतवणूकदार भारतीय शेअर बाजारात विक्री करीत असल्याचे वातावरण आहे. सोमवारी या गुंतवणूकदारांनी 2,589 कोटी रुपयांच्या शेअरची विक्री केली. याच कारणामुळे रुपयाच्या मूल्यावरही नकारात्मक परिणाम होत असून मंगळवारी रुपयाचा भाव 21 पैशांनी कमी होऊन 85.60 रुपये प्रति डॉलर या पातळीवर गेला. रशिया- युक्रेन युद्ध अधिक चिघळण्याची शक्यता आता गुंतवणूकदारांना वाटत आहे.
कारण या आठवड्यात दोन्ही देशांनी परस्पराविरोधात हल्ले वाढविल्यामुळे वित्त आणि मनुष्यहानी वाढत चालली आहे. जागतिक अस्थिरतेमुळे अमेरिकेच्या डॉलर कमकुवत झाला. त्याचबरोबर शेअर बाजारातही अस्थिर वातावरण होते. अशा परिस्थितीत रिअॅल्टी क्षेत्र वगळता इतर क्षेत्रातील कंपन्यांच्या शेअरची विक्री करून गुंतवणूकदारांनी नफा काढून घेणे पसंत केले.





