लॉकडाऊन काळातील एकच अचूक वीजबिल पडणार हातात
महावितरणकडून मिटर रिडींग घेण्याचे काम सुरू
पुणे – लॉकडाऊन कालावधीत मीटर रिडींग तात्पुरते बंद असल्याने ग्राहकांना सरासरी युनिटचे वीजबिल येत होते. तसेच, वेबपोर्टल व मोबाइल ऍपद्वारे स्वतःहून मीटर रिडींग पाठविणाऱ्या ग्राहकांना प्रत्यक्ष वीजवापरानुसार बिले मिळत होती. मात्र एप्रिल, मे आणि जून महिन्यांत स्वतःहून रिडींग न पाठविणाऱ्या वीजग्राहकांना आता मीटर रिडींग घेतल्यानंतर अचूक व प्रत्यक्ष वीजवापरानुसार बिल पाठविण्यात येत आहे. हे वीजबिल लॉकडाऊन कालावधीतील दोन-अडीच महिन्यांचे असले तरी संगणकीय प्रणालीद्वारे बिलाची मासिक वापरानुसार विभागणी करून युनिट व स्लॅबप्रमाणे वीजदर लावून देण्यात येत आहे.
करोनामुळे लॉकडाऊन कालावधीत शहरासह जिल्ह्यात महावितरणकडून मीटर रिडींग घेणे व छापील वीजबिल वितरीत करणे तात्पुरते बंद केले होते. मात्र, आता लॉकडाऊन शिथिल झाल्यामुळे वीजबिल भरणा केंद्र सुरू करण्यासोबतच ग्राहकांकडे जाऊन मीटर रिडींग घेणे व वीजबिल वितरीत करणे सुरू केले आहे.
स्थानिक प्रशासनाची परवानगी मिळालेल्या भागात आणि करोना प्रतिबंधित क्षेत्र वगळून ते सुरू केले आहे. दरम्यान, 23 मार्चनंतर आता वीजग्राहकांकडील मीटर रिडींग घेतल्यानंतर प्रत्यक्ष वीजवापराच्या युनिटप्रमाणे दोन ते अडीच महिन्यांचे एकच अचूक वीजबिल दिले जात आहे. यामध्ये ग्राहकांनी एप्रिल, मे महिन्यात भरलेली रक्कम व सरासरी युनिट समायोजित केले जात आहे.
खबरदारी घेण्याच्या सूचना
लघुदाब वर्गवारीत पुणे शहरात 16 लाख 47 हजार, पिंपरी-चिंचवड शहरात 6 लाख 67 हजार, तर मुळशी, मावळ, वेल्हे, आंबेगाव, जुन्नर व खेड तालुक्यांत 6 लाख 38 हजार वीजग्राहक आहेत. एजन्सीच्या कर्मचाऱ्यांनी मीटर रिडींग घेताना हॅन्डग्लोव्होज, मास्क, सॅनिटाझर तसेच फिजिकल डिस्टन्सिंगच्या नियमाचे काटेकोर पालन करण्याच्या सूचना दिल्या आहेत. तसेच, सोसायट्यांमध्ये प्रवेश करण्यापूर्वी आवश्यक असल्यास परवानगी घेण्याचे आदेश सुद्धा दिले आहेत.