पवना धरणातून विसर्ग वाढविला

पिंपरी – पवना धरण परिसरात पावसाचा जोर कायम आहे. सध्या धरणात ९२ टक्के इतका पाणीसाठा आहे. धरणात मोठ्या वेगात पाणी येत असल्याने पाण्याचा विसर्ग वाढवून पाच हजार इतका करण्यात आला आहे.
पवना धरणाच्या सांडव्यावरून १८०० क्युसेस तर जलविद्युत केंद्रामधून विदुयतगृहाद्वारे १४०० क्युसेस असा एकूण ३२०० इतक्या क्षमतेने नदीपात्रात विसर्ग सुरू होता. मात्र पवना धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर वाढल्याने धरणाच्या पाणी पातळीत मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे.
पाच हजार क्युसेस पाण्याचा विसर्ग
धरणातील हा पाणीसाठा नियंत्रित करण्याकरिता शुक्रवारी (दि. २) दुपारी तीन वाजल्यापासून सांडव्यावरून विसर्ग वाढवून ३६०० क्युसेस इतक्या क्षमतेने नदीपात्रात विसर्ग करण्यात आला आहे. यामुळे नदी पात्रामध्ये एकूण पाच हजार क्युसेस इतक्या क्षमतेने विसर्ग होत आहे.
खरबदारी घेण्याचे आवाहन
पाणलोट क्षेत्रात होणार्या पावसाच्या प्रमाणानुसार धरणातून नदीपात्रात होणारा विसर्ग पुन्हा कमी/जास्त करण्यात येईल, असे पवना धरण पूरनियंत्रण कक्षाकडून सांगण्यात आले आहे. तसेच नदीपात्रात कोणीही उतरू नये आणि नदी मधील पाण्याचे पंप, नदी काठचे शेती अवजारे व तत्सम साहित्य अथवा जनावरे असल्यास तात्काळ हलविण्यात यावेत. सखल भागातील संबंधित नागरिकांना सूचना देण्यात याव्यात, सर्वांनी योग्य ती खबरदारी व दक्षता घेत जलसंपदा विभागास/प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहन पवना धरण पूरनियंत्रण कक्षाकडून करण्यात आले आहे.




