महुआ मोइत्रांच्या अडचणीत वाढ; रेखा शर्मा यांच्यावर आक्षेपार्ह टिप्पणीप्रकरणी गुन्हा दाखल

नवी दिल्ली : राष्ट्रीय महिला आयोगाच्या प्रमुख रेखा शर्मा यांच्याबद्दल आक्षेपार्ह पोस्ट केल्याप्रकरणी तृणमूल काँग्रेसच्या खासदार महुआ मोईत्रा यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मोईत्रांविरुद्ध महिलांच्या आत्मसन्मानाला ठेच पोहोचवल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. राष्ट्रीय महिला आयोगाने सांगितले की त्यांनी आयोगाच्या अध्यक्षा रेखा शर्मा यांच्या विरोधात केलेल्या वक्तव्याबद्दल तृणमूल काँग्रेस लोकसभा सदस्य महुआ मोईत्रा यांच्यावर कायदेशीर कारवाई सुरू केली आहे.
एक्सवर पोस्ट केलेल्या व्हिडिओवर टीएमसी खासदाराने केलेल्या टिप्पणीमुळे हे पाऊल उचलण्यात आले आहे. व्हिडिओमध्ये राष्ट्रीय महिला आयोगाच्या प्रमुख उत्तर प्रदेशातील हाथरस येथे चेंगराचेंगरीच्या ठिकाणी पोहोचल्याचे दाखवले होते, ज्यावर महुआने आक्षेपार्ह टिप्पणी केली होती. एनसीडब्ल्यूने एका निवेदनात म्हटले आहे की दिल्ली पोलिसांकडे औपचारिक तक्रार दाखल करण्यात आली आहे आणि संसदेत लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांना पत्र पाठवण्यात आले आहे की मोईत्रा यांच्या टिप्पण्या निंदनीय आहेत आणि खासदार म्हणून त्यांच्या स्थितीला अनुसरून नाहीत. याबाबत राष्ट्रीय महिला आयोगाकडे तक्रार आली होती. ज्यामध्ये सोशल मीडिया साइट X वर खासदार महुआ मोईत्रा यांच्या विरोधात आक्षेपार्ह टिप्पणी करण्यात आली आहे. भारतीय न्यायिक संहितेच्या कलम 79, 2023 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या संपूर्ण प्रकरणावर महिला आयोग काय म्हणाले?
एनसीडब्ल्यूने म्हटले आहे की ही ‘अशोभनीय’ टिप्पणी केवळ अपमानास्पद नाही तर स्त्रीच्या सन्मानाने जगण्याच्या अधिकाराचे उल्लंघन देखील आहे. दिल्ली पोलिसांना दिलेल्या आदेशात, आयोगाने म्हटले आहे की सखोल विचारविनिमय केल्यानंतर असे आढळून आले की ही टिप्पणी भारतीय न्याय संहिता, 2023 च्या कलम 79 अंतर्गत येते. एनसीडब्ल्यूने सांगितले की ते अपमानजनक टिप्पण्यांचा तीव्र निषेध करते आणि मोईत्रा यांच्यावर कठोर कारवाई करू इच्छिते. मोइत्राविरुद्ध एफआयआर नोंदवण्यात यावा आणि कारवाईचा तपशीलवार अहवाल तीन दिवसांत आयोगाला सादर करावा.





