दिव्यांगांचे अनुदान सहा हजार करा; महागाईच्या पार्श्वभूमीवर दिव्यांग बांधवांची मागणी
PCMC : गेल्या अनेक वर्षांपासून दिव्यांग संघटना आणि बांधवांकडून अनुदान वाढविण्याची मागणी

पिंपरी – पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेकडून दिव्यांग बांधवांना देण्यात येणाऱ्या पंडित दीनदयाळ उपाध्याय अनुदानात वाढ करून दरमहा सहा हजार रुपये देण्यात यावेत, अशी मागणी अपंग सेवक संघटना महाराष्ट्र राज्याच्या वतीने करण्यात आली आहे. याबाबत संघटनेचे अध्यक्ष राजेंद्र वाकचौरे यांनी महापालिका आयुक्तांकडे निवेदनाद्वारे मागणी केली आहे.
महापालिकेच्या माध्यमातून शहरातील दिव्यांगांना सध्या पंडित दीनदयाळ उपाध्याय अनुदान योजनेअंतर्गत दरमहा अडीच हजार रुपये अनुदान दिले जाते. मात्र, वाढती महागाई, दैनंदिन गरजा आणि औषधोपचाराचा खर्च लक्षात घेता ही रक्कम अपुरी पडत असल्याचे संघटनेने म्हटले आहे. २०१९ पासून आजपर्यंत दिव्यांग बांधवांच्या अनुदानामध्ये कोणत्याही प्रकारची वाढ करण्यात आलेली नाही.
गेल्या अनेक वर्षांपासून दिव्यांग संघटना आणि बांधवांकडून अनुदान वाढविण्याची मागणी सातत्याने करण्यात येत आहे. मात्र, या मागणीकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप संघटनेने केला आहे. सध्याच्या महागाईच्या काळात अडीच हजार रुपयांचे मासिक अनुदान दिव्यांगांच्या गरजा भागविण्यासाठी पुरेसे नाही. त्यामुळे महापालिकेने शहरातील सर्व पात्र दिव्यांग बांधवांच्या अनुदानात वाढ करून ते दरमहा सहा हजार रुपये करावे, अशी मागणी करण्यात आली आहे.
दिवाळीसाठी पाच हजार रुपयांची मागणी
याशिवाय दिवाळीच्या पार्श्वभूमीवर दिव्यांग बांधवांना विशेष अनुदान म्हणून पाच हजार रुपये देण्यात यावेत, अशीही मागणी निवेदनातून करण्यात आली आहे. महापालिका प्रशासनाने दिव्यांगांच्या आर्थिक परिस्थितीचा आणि वाढत्या महागाईचा विचार करून सकारात्मक निर्णय घ्यावा, अशी अपेक्षा संघटनेने व्यक्त केली आहे.
Khopoli News: खोपोलीत नवजात मुलीचा मृत्यू; रुग्णालयावर नातेवाईकांकडून गंभीर आरोप





