सासवड : सासवड नगर परिषद निवडणुकीची गेल्या काही दिवसांपासून रंगलेली रणधुमाळी मतदानानंतर थंडावली असून, प्राथमिक माहितीनुसार शहरात सरासरी 66.5 टक्के मतदान झाल्याची माहिती निवडणूक विभागाने दिली आहे. एकूण 33 मतदान केंद्रांवर दिवसभर उत्साहपूर्ण वातावरण पाहायला मिळाले. यामध्ये चार नगराध्यक्ष पदांचे उमेदवार तसेच 44 नगरसेवकांच्या भवितव्यावर येथील मतदारांनी शिक्कामोर्तब केले असून निकाल लागेपर्यंत सर्वांचे राजकीय भवितव्य मतपेट्यांमध्ये सील करण्यात आले आहे. निवडणूक प्रक्रिया शांततेत आणि सुरळीत रित्या पार पाडण्यासाठी निवडणूक निर्णय अधिकारी सतीश थेटे, सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी कैलास चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली उत्तम व्यवस्था केली होती. दिवसभरात कोणत्याही प्रकारची अनुचित घटना, कायदा व सुव्यवस्थेला बाधा आणणारी समस्या किंवा गोंधळाची परिस्थिति उद्भवली नाही, ही अर्थातच निवडणूक प्रशासनासाठी दिलासादायक बाब ठरली आहे. यावेळी शहरात मोठ्या प्रमाणावर पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. सासवड पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक कुमार कदम यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व मतदान केंद्रांवर पोलीस अधिकारी व कर्मचारी दक्षतेने पहारा देत होते. सकाळपासूनच शहरात कडेकोट सुरक्षा व्यवस्था ठेवली होती. त्यामुळे मतदार निर्धास्तपणे मतदान करण्यासाठी बाहेर पडले. मतदारांनी लोकशाही प्रक्रियेबद्दल जागरूकता दाखवत मतदानाचा हक्क बजावला. निकाल लागेपर्यंत राजकीय वातावरणात उत्सुकता वाढली असून, नगराध्यक्ष आणि नगरसेवक पदांच्या निवडणुकीत कोण बाजी मारणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. सखी महिला मतदान केंद्राने लक्ष वेधले यावर्षीच्या निवडणुकीत विशेष आकर्षण ठरलेली गोष्ट म्हणजे वाघेरे महाविद्यालयात उभारण्यात आलेली सखी महिला मतदान केंद्राची संकल्पना. महिलांसाठी स्वतंत्र, सुरक्षित व आनंददायी वातावरण देण्यासाठी हे केंद्र खास सजवण्यात आले होते. आकर्षक फुग्यांची सजावट, स्वागत फलक आणि सुबक व्यवस्था यामुळे महिला मतदारांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले. अनेक महिलांनी या मतदान केंद्राला विशेष पसंती दर्शवली. वाघेरे महाविद्यालयातील फार्मसी विभागात पर्यावरण पूरक मतदान केंद्र उभारण्यात आले होते. पर्यावरण संवर्धनाचा संदेश देण्यासाठी या केंद्रात प्लास्टिकमुक्त व्यवस्था, पाणी बचत संदेश, झाडांच्या रोपांची सजावट आणि कागदाचा कमी वापर याला प्राधान्य देण्यात आले. मतदारांनीही या उपक्रमाला चांगला प्रतिसाद दिला.