राज्यात मतदान केंद्रांच्या संख्येत वाढ ; ९७ हजार ६४० केंद्रांवर होणार आता मतदान

मतदार नोंदणी मोहिमेला प्रतिसाद; मतदार संख्या वाढल्याने मतदान केंद्रांत वाढ

मुंबई: येत्या लोकसभा निवडणुकीसाठी राज्यात नव्याने दोन हजारांहून अधिक मतदान केंद्र वाढविण्यात आली आहेत. त्यामुळे आता महाराष्ट्रात एकूण97 हजार 640 मतदान केंद्र असणार आहेत.

नाशिकमध्ये 274 वाढीव मतदान केंद्र, पुण्यामध्ये 237 आणि ठाण्यामध्ये 227वाढीव मतदान केंद्र असणार आहेत. मात्र सिंधुदुर्गमध्ये एकही वाढीव मतदान केंद्र नसेल.

साधारणपणे 1 हजार 400 मतदारांमागे 1 मतदान केंद्र असण्याचे प्रमाण आहे. गेल्या काही दिवसात मतदारांना नाव नोंदणीसाठी मुदतवाढ देण्यात आली होती. यामध्ये मतदारांची वाढ झाल्याचे दिसून आल्याने मतदान केंद्रांचीही वाढ करण्यात आली आहे. यंदाच्या लोकसभा निवडणुकांसाठी यापूर्वी 95 हजार 473मतदान केंद्र स्थापन करण्याचे नियोजन होते. आता मात्र मतदारांची संख्या वाढली असल्याने नव्याने 2 हजार 167 मतदान केंद्र राज्यभरात वाढविण्यात आली आहेत. याचाच अर्थ आता एकूण 97 हजार 640 मतदान केंद्र असणार आहेत.

2004 साली झालेल्या लोकसभा निवडणुकांसाठी एकूण 64 हजार 508 मतदार केंद्र होती. तर 2009 मध्ये  एकूण 83 हजार 986 मतदार केंद्र स्थापन करण्यात आली. 2014 मध्ये एकूण 91 हजार 329 मतदार केंद्र स्थापन करण्यात आली. यंदाच्या निवडणुकीमध्ये 97 हजार 640 मतदान केंद्र स्थापन करण्यात येणार आहेत.

मतदान केंद्र स्थापन करण्याचे निकष, मतदान केंद्राची रचना, मतदान केंद्र ठरविताना किमान आणि कमाल मतदार ठरविणे, मतदान केंद्रांच्या यादीची प्रसिद्धी,संवेदनशील व अतिसंवेदनशील मतदान केंद्रांची निश्चिती, मतदान केंद्रावरील सुविधा याबाबतचा निर्णय भारत निवडणूक आयोगामार्फत घेण्यात येतो.  मतदार केंद्रांची ‘संवेदनशीलता’ बघून त्या ठिकाणी आवश्यक सुरक्षा पुरविण्यात येते.

केंद्रीय निवडणूक आयोगाने जारी केलेल्या मार्गदर्शक तत्वानुसार प्रत्येक मतदान केंद्रावर किमान 15 प्रकारच्या मूलभूत सुविधा असणे बंधनकारक आहे. दुर्गम भागात असलेल्या मतदान केंद्रांवर विशेष काळजी घेण्यात येणार आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.