Alephata : दूध दरवाढीने गायींच्या खरेदी-विक्रीत वाढ
Alephata : जुन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आळेफाटा उपबाजारात गुरुवारी (दि. 19) विक्रीसाठी 425 गायी दाखल झाल्या. त्यापैकी 383 गायींचे व्यवहार पूर्ण झाले.

आळेफाटा : दूध दरातील वाढीने दुग्ध व्यवसायाला पुन्हा उभारी मिळू लागली असून, त्याचे पडसाद आळेफाटा उपबाजारात उमटले आहेत. दूध उत्पादनातून चांगल्या उत्पन्नाची अपेक्षा असल्याने शेतकर्यांनी गाय खरेदीकडे मोर्चा वळविला आहे. गुरुवारी भरलेल्या आठवडे बाजारात गायींची मोठी खरेदी-विक्री होऊन तब्बल 84 लाख रुपयांची उलाढाल झाली.
जुन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आळेफाटा उपबाजारात गुरुवारी (दि. 19) विक्रीसाठी 425 गायी दाखल झाल्या. त्यापैकी 383 गायींचे व्यवहार पूर्ण झाले. उच्च प्रतीच्या संकरित गायीला 1 लाख 1 हजार रुपये भाव मिळाला, तर सर्वसाधारण गायींचे दर पाच हजारांपासून सुरू झाले. अनेक महिन्यांनंतर बाजारात झालेल्या या मोठ्या उलाढालीने पशुपालक आणि व्यापार्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले. गेल्या दोन महिन्यांपासून दुष्काळसदृश परिस्थिती आणि चारा-पाण्याच्या टंचाईमुळे जनावरांच्या बाजारावर मंदीचे सावट होते.
मात्र, दूध दरातील वाढीने हे चित्र बदलू लागले आहे. चारा-पाण्याची व्यवस्था असलेल्या शेतकर्यांनी दुग्ध व्यवसाय विस्तारण्याची तयारी सुरू केली असून, नव्या गायींच्या खरेदीसाठी बाजारात गर्दी होत आहे. आळेफाटा उपबाजारात संकरित गायी आणि कालवडींचे मोठ्या प्रमाणावर व्यवहार होतात. दूध देण्याची क्षमता, वय, जात, आरोग्य आणि गुणवत्ता यावर जनावरांचे दर ठरतात. पुणे, नाशिक, ठाणे, अहिल्यानगर आणि मराठवाड्यातील शेतकरी व व्यापार्यांची येथे नियमित वर्दळ असते. त्यामुळे या बाजाराला जिल्ह्याबाहेरील व्यापारी महत्त्वही प्राप्त झाले आहे.
आळेफाटा उपबाजारातील वाढती उलाढाल दुग्ध व्यवसायाकडे शेतकर्यांचा पुन्हा वाढत असलेला कल दर्शविते, असे बाजार समितीचे सभापती संजय काळे व उपसभापती निवृत्ती काळे यांनी सांगितले. बाजारातील आवक, विक्री आणि उलाढालीची माहिती संचालक प्रीतम काळे, सचिव रूपेश कवडे आणि कार्यालयप्रमुख सतीश मस्करे यांनी दिली.
पशुखाद्याचा खर्च मात्र डोईजड
दूध दरवाढीमुळे दुग्ध व्यवसायातून उत्पन्न वाढण्याची आशा असली, तरी पशुखाद्याच्या वाढत्या किमती शेतकर्यांसमोर नवे आव्हान उभे करीत आहेत. चारा, पाणी आणि पशुखाद्याचा खर्च वाढत असल्याने गायी खरेदी करताना शेतकर्यांना नफ्या-तोट्याचा हिशेब मांडावा लागत आहे.





