तळेगाव दाभाडे- मागील काही दिवसांपासून उन्हाचा तडाखा वाढल्यामुळे अनेक ठिकाणी आग लागण्याचे प्रमाण वाढले आहे. प्रामुख्याने डोंगर, कचऱ्याचे ढीग, बेवारस असणाऱ्या वस्तू तसेच शॉक सर्किटमुळे आगीच्या घटना घडत आहेत. कारखान्यांमध्ये फेब्रुवारी आणि मार्च महिन्यात आगीच्या घटनांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होते. याचे प्रामुख्याने कारण म्हणजे या महिन्यांमध्ये उन्हाळ्याला सुरवात होते. अतिप्रमाणात उष्णता निर्माण झाल्याने त्यातून आगीच्या घटना घडतात. तर काही ठिकाणी विम्याच्या पैशासाठी किंवा व्यवसायात नुकसान झाल्याचे दाखविण्यासाठी आगी लावण्यात येतात, अशाही चर्चा आहेत. मागील आठवड्यात कामशेत पोलीस स्टेशनच्या मागील बाजूस ठेवण्यात आलेल्या अपघात व गुन्ह्यातील वाहनांना आग लागून सुमारे 14 वाहनांचे मोठे नुकसान झाले होते. तळेगाव दाभाडे येथील हरणेश्वर टेकडीच्या मागील बाजूस एका झाडाला आग लागली होती, अग्निशमन दलाने वेळेतच ती आग विझवल्याने पुढील अनर्थ टळला. सह्याद्रीच्या डोंगर रांगेतील अनेक डोंगरावरील गवत सुकलेल्या स्थितीत आहे. या ठिकाणी उष्णता व झाडातील घर्षण यामुळे मोठ्या प्रमाणावर वणवा लागण्याचे प्रमाण वाढले आहे. तर काही ठिकाणी वाळलेल्या गवताला जाणीवपूर्वक आग लावण्यात येते. वाळलेले गवत जळून गेल्याने पुढील वर्षी चांगले गवत येते, असे काहींचे म्हणणे आहे. डोंगर भागातील आग किंवा वणव्यामुळे दुर्मिळ वन संपत्ती, वन्यप्राणी यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होत आहे. गेल्या काही दिवसांपासून तीव्र उन्हाला जाणवू लागला आहे. वाढत्या उष्म्यामुळे नागरिक हैराण झाले आहेत. दरवर्षी उन्हाळ्यात आग लागण्याच्या घटनांमध्ये वाढ झाल्याचे दिसून येते. काहीवेळा आगीच्या मोठ्या घटनांमध्ये मोठी वित्तहानी देखील होते. घरे किंवा कारखान्यांमध्ये आग शमविणे तुलनेत सोपे असते. मात्र जंगल परिसर आणि कचरा डेपोला लागलेली आग शमविणे अवघड असते. कारण ही आग उघड्यावर असल्याने वाऱ्यामुळे मोठ्या प्रमाणात झपाट्याने पसरते. उन्हाळ्यात इमारती, घरं, कारखान्यांमध्ये रासायिक प्रक्रियेतून किंवा शॉर्टसर्किटमुळे आग लागण्याच्या घटनांमध्ये वाढ होत असते. अधिक तापमान, गॅसगळती किंवा मानवी चुकीमुळे आग लागणे हे मुख्य कारण आहे. उन्हाळ्यामध्ये घरगुती वापरात येणाऱ्या एसी, कुलर, फॅन तसेच मायक्रोवेव्ह ओवन, ओपन इंडक्शन, इस्त्री आदी वस्तूंची वेळेवर देखभाल दुरुस्ती करणे गरजेचे आहे. अनेक वेळा किचनमधील चिमणीत असलेल्या ब्लॉकेजमुळे आग लागण्याचे घटना घडल्या आहेत. त्यामुळे दुपारच्यावेळी अधिक तापमान असलेली उपकरणे वापरणे शक्यतो टाळावीत, असे आवाहन अग्निशामक दलाकडून केले जात आहे. उन्हाळ्याच्या दिवसामध्ये डोंगरावर जाऊन चुलीवर स्वयंपाक केल्यानंतर चूल पूर्णपणे विझवावी. आपल्या परिसरातील आगीच्या घटना रोखण्यासाठी नागरिकांनी सतर्क राहावे. तसेच कुठल्याही परिसरात आग लागल्यानंतर अग्निशमन दलाला त्वरित याची माहिती द्यावी. – शेखर खोमणे, फायरमन