आयुष उपचार पद्धतीचा जीवनदायी योजनेत समावेश करा

जामखेड -राज्य शासनाची अत्यंत महत्वाची असलेली महात्मा ज्योतिबा फुले जीवनदायी योजना सर्व सामान्य नागरिकांसाठी महत्त्वाची आहे. मात्र, या योजनेत ऍलोपॅथिक पद्धतीनुसार उपचार करण्यात येतात. या योजनेत आयुष उपचार पद्धतीचा समावेश केल्यास ही पद्धत सर्वसामान्य नागरिकांना परवडणारी आहे. त्यामुळे आयुष उपचार पद्धतीचा महात्मा ज्योतिबा फुले जीवनदायी योजनेत समावेश करण्याची मागणी रत्नदीप मेडिकल फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष डॉ.भास्कर मोरे यांनी आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्याकडे केली. मंत्री टोपे यांनीही सकारात्मक प्रतिसाद देऊन योजनेत समाविष्ट करण्याचे संकेत दिले आहेत.
आरोग्यमंत्री राजेश टोपे विविध विकास कामांचे भूमिपूजन करण्यासाठी कर्जत व जामखेड तालुक्याच्या दौऱ्यावर आले होते. यावेळी रत्नदीप मेडिकल फाउंडेशनचे अध्यक्ष डॉ. भास्करराव मोरे यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट दिली. यावेळी दिलेल्या निवेदनात म्हटले की, महात्मा ज्योतिबा फुले जीवनदायी योजना ही सर्वसामान्य गोरगरीब रुग्णांसाठी अत्यंत महत्वाकांक्षी योजना आहे. मात्र, जीवनदायी योजनेत फक्त ऍलोपॅथिक उपचार पध्दतीनुसार उपचार करण्यात येतात. आयुष उपचार पद्धत ही सर्वसामान्य लोकांना परवडणारी किफायतशीर पद्धत आहे. या उपचार पद्घतीनुसार उपचार घेणाऱ्यांची वाढती संख्या पाहता या उपचार पद्धतीचा महात्मा फुले जीवनदायी योजनेत समावेश करणे आवश्यक आहे.
आयुष अंतर्गत आयुर्वेद, योगा, युनानी, सिद्धा व होमिओपॅथी या उपचार पध्दतीचा समावेश आहे. यापैकी महाराष्ट्र राज्यात आयुर्वेदिक व होमिओपॅथिक उपचार घेणाऱ्या रुग्णांची संख्या काही लाखात आहे. त्यामुळे महात्मा ज्योतिबा फुले जीवनदायी योजनेत आयुष उपचार पद्धतीचा समावेश करून राज्यातील शासकीय व शासनमान्य खाजगी आयुष (आयुर्वेदिक व होमिओपॅथिक) वैद्यकीय महाविद्यालयांशी संलग्न रुग्णालयात ही योजना कार्यान्वित करण्यात यावी, अशी मागणी डॉ मोरे यांनी केली.





