satara | म्हसवड परिसरातील बससेवा बंद असल्याने गैरसोय

दहिवडी, म्हसवड (प्रतिनिधी)- म्हसवड बस स्थानकांतर्गत बंद करण्यात आलेल्या एसटी बसच्या स्थानिक सर्व फेऱ्या दहिवडी आगाराने तातडीने सुरु कराव्यात, असे निवेदन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्यावतीने दहिवडी आगारप्रमुखांना देण्यात आले.
सध्या एसटी फेऱ्या बंद केल्या असल्याने म्हसवड बस स्थानकांतर्गत येणाऱ्या गावातील प्रवाशांचे व शालेय विद्यार्थ्यांचे येण्याजाण्यासाठी प्रचंड हाल होत असून म्हसवड पंचक्रोशीतील नागरिकांना कोण वाली आहे का, असा सवाल ग्रामीण भागातील सर्वसामान्यातून विचारला जात आहे.
म्हसवड बस स्थानकावरील प्रवाशांचे आणि शालेय विद्यार्थ्यांचे क्लासला ये- जा करण्यासाठी खूप हाल होत असल्याने याबाबत जिल्हा एसटी प्रशासनाने म्हसवड पंचक्रोशीत अंदाजे ५० लहान मोठी गावे आहेत. या ५० गावांत साधारणतः आठ प्रमुख रस्ते आहेत. एका रस्त्याने साधारणतः सहा ते सात गावे जोडली आहेत.
म्हसवड बस स्थानकातून या प्रमुख रस्त्यावर असणाऱ्या एसटीच्या बहुतेक सर्व फेऱ्या दहिवडी आगाराने बंद केल्या असल्याने प्रवाशांची गैरसोय व शालेय विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. म्हसवड- विरळी, म्हसवड- खरसुंडी, म्हसवड- इंजबाब, म्हसवड- संभुखेड, म्हसवड- भाटकी- माळशिरस, म्हसवड- शिंगणापूर, म्हसवड- हिंगणी, म्हसवड- देवापूर, वरकुटे- मलवडी इत्यादी ठिकाणी स्थानिक एसटी फेरीमुळे रोज हजारो प्रवाशांना एसटी सेवेचा लाभ होत होता.
गेल्या आठ ते दहा दिवसापासून म्हसवड बस स्थानकांतर्गतच्या बहुतेक सर्व फेऱ्या व मुक्कामी एसटी सेवा बंद करण्यात आल्याने प्रवाशांचे हाल होत आहेत. कॉलेजचे विद्यार्थी दुचाकीवरुन येजा करतात. मात्र, गरिब विद्यार्थ्यांच्या प्रवासाचे काय, असा प्रश्न आहे.
बससेवा सुरु न झाल्यास आंदोलन…
म्हसवड परिसरातील ५० गावांतील प्रवाशांचे आणि विद्यार्थ्यांचे हित लक्षात घेता दहिवडी आगाराने आठ दिवसापूर्वी बंद केलेल्या एसटीच्या सर्व फेऱ्या व मुक्कामी सुविधा तातडीने दोन दिवसांच्या आत सुरु कराव्यात अन्यथा एसटी प्रशासनाविरोधात मनसे स्टाइलने आंदोलन करावे लागेल. यादरम्यान काही अनुचित प्रकार घडल्यास याची सर्वस्वी जबाबदारी एसटी प्रशासनाची राहिल. धैर्यशील पाटील (जिल्हाध्यक्ष, मनसे)





