12 लाख रुपयांपर्यंतच्या उत्पन्नावर रिबेटचा फायदा कसा मिळणार? जाणून घ्या नवीन आयकर नियम

Income tax Rules: केंद्रीय अर्थसंकल्प 2025 मध्ये करदात्यांना मोठा दिलासा देत 12 लाख रुपयांपर्यंतचे उत्पन्न कर मुक्त करण्यात आले आहे. आता नवीन कर प्रणाली अंतर्गत 12 लाख रुपयांपर्यंतच्या उत्पन्नावर विशेष कर सवलत (रिबेट) मिळणार आहे. करदात्यांना कलम 87A अंतर्गत एकूण देय करावर विशेष सवलत (रिबेट) मिळते.
आधी नवीन कर प्रणालीमध्ये 25,000 रुपयांपर्यंत रिबेट मिळत असे, ज्यात आता वाढ करण्यात आली आहे. तर, जुन्या कर प्रणालीमध्ये 12,500 रुपयांपर्यंत रिबेट मिळत असे.
नवीन कर प्रणाली काय आहे?
- 4 ते 8 लाख रुपयांवर 5 टक्के कर
- 8 ते 12 लाख रुपयांवर 10 टक्के कर
- 12 ते 16 लाख रुपयांवर 15 टक्के कर
- 16 ते 20 लाख रुपयांवर 20 टक्के कर
- 20 ते 24 लाख रुपयांवर 25 टक्के कर
- 24 लाख रुपयांपेक्षा जास्त उत्पन्नावर 30 टक्के कर
कलम 87A अंतर्गत करदात्यांना कसा फायदा होणार ?
केंद्रीय अर्थसंकल्प 2025 अंतर्गत नवीन कर प्रणालीमध्ये कलम 87A अंतर्गत 12 लाख रुपयांपर्यंतचे वार्षिक उत्पन्न करमुक्त असेल. यापूर्वी ही सवलत 7 लाख रुपयांपर्यंतच्या उत्पन्नासाठी होती. आता ही रक्कम वाढवून 12 लाख रुपये करण्यात आली आहे.
म्हणजेच, नवीन कर प्रणाली अंतर्गत, सरकार 4 ते 8 लाख रुपयांवर 5% आणि 8 ते 12 लाख रुपयांच्या उत्पन्नावर 10% कर माफ करेल. यातून करदात्यांना 60 हजार रुपयांचा फायदा होणार आहे.
केंद्रीय अर्थसंकल्प 2025 मध्ये कर सवलतीत कोणते बदल करण्यात आले?
नवीन कर प्रणालीमध्ये रिबेटची मर्यादा 25,000 रुपयांवरून वाढवून 60 हजार रुपये करण्यात आली आहे. यापुढे करदात्यांना 12 लाख रुपयांपर्यंतच्या उत्पन्नावर 60,000 रुपयांपर्यंत रिबेटचा फायदा मिळेल.
कॅपिटेल गेन, लॉटरीच्या रक्कमेवर रिबेटचा फायदा मिळणार का?
कॅपिटल गेन, लॉटरी किंवा इतर मालमत्तांमधून मिळणाऱ्या उत्पन्नावर कोणतेही रिबेट मिळणार नाही. या उत्पन्नांवर कलम 87A अंतर्गत कोणताही लाभ मिळणार नाही. या रक्कमेवर कर भरावाच लागेल.
जुन्या कर प्रणालीमध्ये मिळणाऱ्या कर सवलतीत बदल झाला आहे का?
जुन्या कर प्रणालीमध्ये सरकारकडून कोणताही बदल करण्यात आलेला नाही. यात आधीप्रमाणेच 5 लाख रुपयांपर्यंतच्या उत्पन्नावर 12,500 रुपयांपर्यंत रिबेटचा फायदा मिळेल.
रिबेटचा फायदा घेण्यासाठी कोणती प्रक्रिया पूर्ण करावी लागेल?
12 लाख रुपयांपर्यंतचे वार्षिक उत्पन्न असलेली व्यक्ती रिबेट मिळवू शकते. याचा लाभ घेण्यासाठी नवीन कर प्रणालीअंतर्गत ITR दाखल करणे आवश्यक आहे.





