Income Tax Phishing Scam : ₹6000 चा टॅक्स मेसेज आलाय? बँक खाते रिकामे होण्यापूर्वी PIB चा हा इशारा नक्की वाचा!
Income Tax Phishing Scam : इन्कम टॅक्सच्या नावाखाली ६,००० रुपये भरण्याचा बनावट मेसेज पाठवून आर्थिक फसवणूक केली जात आहे. PIB ने या फिशिंग स्कॅमबाबत सतर्क राहण्याचा इशारा दिला आहे.

Income Tax Phishing Scam : आयकर परतावा (Income Tax Refund) मिळण्याच्या काळात करदात्यांची फसवणूक करणारे नवे फिशिंग स्कॅम समोर आले आहे. सोशल मीडिया, एसएमएस किंवा ईमेलद्वारे करदात्यांना तब्बल ६,००० रुपयांची बनावट टॅक्स डिमांड पाठवून गंडा घातला जात आहे. प्रेस इन्फॉर्मेशन ब्युरोच्या (PIB) फॅक्ट चेक टीमने हा प्रकार बनावट असल्याचे स्पष्ट करत करदात्यांना सतर्कतेचा इशारा दिला आहे.
काय आहे हा ६,००० रुपयांचा स्कॅम?
सरकारी विभागाशी साधर्म्य साधणारे मेसेज तयार करून थकीत टॅक्स किंवा दंडाच्या नावाखाली ६,००० रुपये भरण्यास सांगतात. रिफंड मिळण्यात अडचण येऊ नये म्हणून अनेक करदाते घाईगडबडीत या लिंकवर क्लिक करतात. हा प्रकार केवळ ६,००० रुपयांपुरता मर्यादित नसून, बनावट लिंकद्वारे बँक तपशील, कार्ड नंबर, पासवर्ड आणि ओटीपी चोरून संपूर्ण खाते रिकामे केले जाऊ शकते.
खऱ्या टॅक्स नोटीसची खात्री कशी कराल?
आयकर विभाग कधीही मेसेज किंवा ईमेलद्वारे संवेदनशील आर्थिक माहिती मागत नाही आणि अनपेक्षित लिंक पाठवत नाही. कोणत्याही मेसेजवर विश्वास न ठेवता थेट आयकर विभागाच्या अधिकृत ई-फायलिंग पोर्टलवर लॉगिन करून ‘टॅक्स डिमांड’ तपासा. तातडीने पैसे भरण्याचा दबाव आणणाऱ्या किंवा दंडाची भीती दाखवणाऱ्या अनोळखी लिंक्स पूर्णपणे दुर्लक्षित करा.
फसवणूक टाळण्यासाठी काय काळजी घ्याल?
संशयास्पद मेसेजमधील लिंकवर क्लिक करू नका आणि कोणतीही फाईल डाऊनलोड करू नका. अनोळखी लिंक ब्राऊझरमध्ये कॉपी-पेस्ट करणे टाळा; त्याऐवजी अधिकृत डोमेन नीट तपासा. बँक तपशील किंवा ओटीपी कोणाशीही शेअर करू नका. तुमच्या उपकरणांमध्ये अँटीव्हायरस सॉफ्टवेअर अपडेट ठेवा.
चुकून लिंकवर क्लिक झाल्यास काय करावे?
माहिती भरली नसल्यास ताबडतोब पेज बंद करा आणि कोणतीही फाईल डाऊनलोड करू नका. माहिती शेअर झाली असल्यास त्वरित संबंधित बँकेशी संपर्क साधून खात्याची सुरक्षा सुनिश्चित करा. राष्ट्रीय सायबर क्राईम रिपोर्टिंग पोर्टलवर किंवा स्थानिक सायबर पोलिसांकडे तक्रार करा आणि ई-फायलिंग खात्याचा पासवर्ड बदला.
e-Filing Vault ने वाढवा सुरक्षा
खाते अधिक सुरक्षित ठेवण्यासाठी आयकर विभागाच्या ‘e-Filing Vault’ सुविधेचा वापर करा. यामध्ये आधार लिंक केलेला ओटीपी, बँक/डिमॅट खाते EVC, डिजिटल सिग्नेचर सर्टिफिकेट आणि नेट बँकिंगद्वारे दुहेरी प्रमाणीकरण (Two-factor Authentication) करून खाते सुरक्षित ठेवता येते.





