Khalapur News: खालापूर तालुक्याचा दुष्काळग्रस्त यादीत समावेश करा
Khalapur News: शेतकऱ्यांना आर्थिक मदत, दुष्काळी सवलती देण्याची मागणी

खालापूर – खरीप हंगाम २०२६ मध्ये पावसाने दडी मारल्याने तालुक्यातील भात आणि नाचणी सारख्या पिकांचे नुकसान झाले आहे.
त्यामुळे तालुक्याचा दुष्काळग्रस्त यादीत समावेश करून शेतकऱ्यांना दुष्काळी सवलती आणि आर्थिक मदत जाहीर करावी, अशी मागणी वरद विनायक शेतकरी सामाजिक संस्था, खानाव यांच्या वतीने करण्यात आली आहे. यासंदर्भात तहसीलदार अभय चव्हाण आणि खालापूर पंचायत समितीचे सभापती कृष्णा पारंगे यांना निवेदन देण्यात आले.
निवेदनानंतर तहसीलदार आणि सभापती यांनी शेतकऱ्यांशी सकारात्मक चर्चा केली. खालापूर तालुक्याचा दुष्काळग्रस्त यादीत समावेश करण्याबाबत आश्वासन दिल्याचे संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले.
यावेळी निवेदन देण्यासाठी शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. ऑगस्ट महिन्याच्या मध्यापासून पावसाचा मोठा खंड पडल्याने पिकांच्या वाढीवर विपरीत परिणाम झाला आहे.
अनेक ठिकाणी पिकांना लोंबी आलेली नाही. काही ठिकाणी दाणे न भरल्याने उत्पादनात मोठी घट होण्याची शक्यता आहे. यंदा सरासरी ३० टक्के उत्पादन मिळणेही कठीण असल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडले आहेत.
आगामी रब्बी आणि उन्हाळी हंगामात तापमान सरासरीपेक्षा पाच अंश सेल्सिअसने वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यामुळे आंबा, काजू, फणस, चिकू यांसारख्या फळपिकांसह कडधान्य पिकांवरही परिणाम होण्याची भीती शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे.
तालुक्यात वाढते औद्योगिकीकरण, उष्णतेचे प्रमाण आणि खडकाळ भौगोलिक रचनेमुळे भूजल पातळी व पाण्याची उपलब्धता कमी असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
या पार्श्वभूमीवर शासनाने तातडीने परिस्थितीची पाहणी करावी. खालापूर तालुक्यातील शेतकऱ्यांना दुष्काळी सवलती, पीक नुकसानभरपाई आणि विशेष आर्थिक मदत जाहीर करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.
Municipal Corporation : महापालिकेत दिवाळी भेटवस्तूंना नो एन्ट्री!





