पिंपरी | लौजी रेल्वे स्थानकात अपुऱ्या सुविधा – विविध समस्यांनी प्रवासी हैराण

खालापूर, (वार्ताहर) – लौजी रेल्वे स्थानक मध्य रेल्वेवरील स्थानक आहे. या स्थानकावरुन असंख्य प्रवाशांची दैनंदिन वर्दळ सुरु असते. या स्थानकाकडे रेल्वे प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे स्थानकावरील समस्या दिवसेंदिवस अधिक जटील बनत आहेत. या स्थानकावर अस्वच्छता, पिण्याच्या पाण्याची अपुरी व्यवस्था, स्वच्छता गृहांचा नुसताच देखावा व अपुरे प्रवासी शेड असल्याने प्रवाशांना त्रास होत आहे.
मध्य रेल्वेच्या खोपोली – कर्जत रेल्वे मार्गावरील लौजी हे एक मुख्य रेल्वे स्थानक आहे. लौजी, चिंचवली, शेडवली, नवघर, श्रीरामनगर, उदयविहार, मुळगाव, वासरंग आदी गावातील विद्यार्थी, महिला, चाकरमानी व सर्व सामान्य नागरिक या रेल्वे स्थानकावरुन मोठ्या संख्येने दैनंदिन प्रवास करीत असल्याने या रेल्वे स्थानकावर मोठी वर्दळ असते. परंतु, या स्थानकावर अनेक समस्या असल्याने प्रवाशांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे.
लौजी रेल्वे स्थानकावर अपुरी आसन व्यवस्था, पिण्याचे पाण्याचे स्टँड बांधलेत पण नळ जोडणी नाही. नळ स्टँडची दयनीय अवस्था झालेली आहेत. स्वच्छता गृहांचा नुसताच देखावा, गर्दुले, तळीरामांचा वावर तसेच स्थानकावर अस्वच्छता पसरल्याने प्रवाशांना दुर्गधीचा सामना करावा लागतो. दुर्गधीमुळे प्रवाशांना रोगराई होऊ शकते.
तसेच प्रवासी शेडची अपुरी अवस्था असल्याने भर उन्हात प्रवाशांना उभे रहावे लागते. काही दिवसांतच पावसाळा सुरू होणार असून प्रवाशांना पावसात रेल्वेची वाट पाहावी लागणार आहे. रेल्वे प्रशासनाने सुविधा पुरवाव्यात, अशी मागणी प्रवासी करत आहेत.





