चिंबळी – खेड तालुक्यातील औद्योगिक क्षेत्रात कार्यरत असलेल्या दक्षिण भागातील मरकळ, सोळू, धानोरे, केळगाव, चिंबळी, कुरूळी, मोई, निघोजे परिसरात भाद्रपद बैल पोळा सण मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. शेतकरीवर्गाचा आवडता सण म्हणजे बैल पोळा…. शेतकऱ्यांनी सकाळ पासूनच बैलाना स्वच्छ पाण्याने धुवून शिगांना सोनेरी रंग लावून गळ्यात घुंगर माळ, फुलाचा हार घातला. अंगावर झुल टाकली, बाशिंग व फुगे बांधले, भंडाऱ्याची उधळण करीत फटाक्याची आतषबाजी केली. संगीत वाद्य लावून संपुर्ण गावात भव्य मिरवणूक काढली. परंपरेनुसार पुरण पोळीचा नैवेद्य दाखवला. सर्व परिसरात मोठ्या उत्साहात बैलपोळा साजरा करण्यात आला. यावेळी महिलांच हस्ते औक्षण करून माजी जिल्हा परिषद सदस्य शांताराम सोनवणे यांच्या परिवारातर्फे देखील मोठ्या उत्साहात भाद्रपद बैल पोळा सण साजरा करण्यात आला.