टपाल कार्यालयातील “सर्व्हर डाउन’

पिंपरी-चिंचवड टपाल कार्यालय सद्यस्थिती
वारंवार उद्‌भवते समस्या ः कर्मचाऱ्यांसह नागरिकांना नाहक मनःस्ताप

पोस्टमनची
संख्या – 136
दैनंदिन एका केंद्रावर येणारी रजिस्टर व स्पीड पोस्ट – 1000 ते 2000

पत्रांची डिलिव्हरी होणारी केंद्रे – 16
ग्रामीण डाक
सेवक – 34  

पिंपरी  – टपाल कार्यालयांचे कामकाज “पेपरलेस’च्या दिशेने सुरू असले तरी वारंवार “सर्व्हर डाउन’ होत असल्याने ऑनलाइन कामकाजाचा खेळखंडोबा होत आहे. टपाल कर्मचाऱ्यांबरोबरच नागरिकांनाही नाहक मनःस्ताप सहन करावा लागत आहे.

टपाल खात्याकडे गेली अनेक वर्षे मनुष्यबळाची वाणवा आहे. टपाल खात्याच्या पुणे पुर्व विभागामध्ये पिंपरी-चिंचवड शहराचा समावेश होतो. यामध्ये पिंपरी-चिंचवडसह खडकी, हडपसर असा पुण्याचा काही भाग देखील येतो. पिंपरी, चिंचवड, प्राधिकरण, चिखली, हिंजवडी, पिंपरी कॉलनी याठिकाणी टपाल कार्यालये आहेत. सुमारे 22 लाख लोकसंख्येच्या शहरासाठी अवघे 136 टपाल कर्मचारी कार्यरत आहेत. शहरातील 16 टपाल कार्यालयांमधील स्थिती पाहिली असता निम्म्या मनुष्यबळावर काम सुरु आहे. एकीकडे मनुष्यबळाअभावी टपाल कर्मचारी ग्रस्त असताना दुसरीकडे टपाल कार्यालयातील अपुऱ्या सोई सुविधांचाही त्यांना सामना करावा लागत आहे.

टपाल खात्याचे कामकाज “पेपरलेस’च्या दिशेने सुरू आहे. मात्र, “पेपरलेस’ कामकाजाला “सर्व्हर डाउन’, ‘सर्व्हर एर्रर’चे ग्रहण लागले आहे. म्हैसूर येथे टपाल खात्याचा मुख्य “सर्व्हर’ आहे. तेथील “ऍक्‍सेस’वर ताण आला की दिवस-दिवस “सर्व्हर डाउन’ होत आहे. आठवड्यातील दोन ते तीन वेळा ही समस्या उद्‌भवू लागली आहे. इंटरनेट सेवेचा वेग कमी आहे. त्यातच “सर्व्हर डाउन’ झाल्यानंतर पोस्टाचे कामकाज ठप्प होते. गुंतवणूकदार, तसेच पोस्टात अन्य कामकाजासाठी येणाऱ्यांना रिकाम्या हाताने परतावे लागत आहे. तासन्‌तास थांबूनही “सर्व्हर’ सुरू होत नाही. अशा परिस्थितीत आल्या पावली परत फिरावे लागते. टपाल कर्मचाऱ्यांच्या ऑनलाईन कामकाजाचा देखील खोळंबा होत आहे. कामकाजाच्या सर्व नोंदी ऑनलाइन कराव्या लागतात. त्यात अडथळा येतो. रोख भरणा करण्यासाठी आलेले खातेदार, विविध योजनांचे काम करणारे बचत प्रतिनिधी यांनाही वारंवार त्रास सहन करावा लागत आहे. “पीएलआय’चे ऑनलाइन हप्ते भरणे, स्पीड पोस्ट, रजिस्टर्ड पोस्ट अशी महत्त्वाची बॅंक, कोर्ट यासंबंधीची पत्र पाठविण्यास अडचणी येत आहेत. हेलपाटे मारावे लागत असल्याने नागरिक संताप व्यक्त करत आहेत.

सर्व्हर समस्येबाबत  अधिकारी

सर्व्हर समस्येबाबत वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे तक्रार घेवून जाणाऱ्या नागरिकांना उर्मटपणाची भाषा वापरली जाते. “”सर्व्हर आमच्या घरचा आहे का”, “”आज नाही काम झाले तर उद्या या”, अशी उत्तरे दिली जातात. एकीकडे हेलपाटे मारावे लागतात. तर दुसरीकडे अधिकारी, कर्मचाऱ्यांकडून उद्धटपणे उत्तरे दिली जात असल्याचा संताप नागरिक व्यक्त करीत आहेत. याबाबत, प्रतिक्रिया जाणून घेण्याचा प्रयत्न केला असता टपाल अधिकाऱ्यांनी उडवा-उडवीची उत्तरे दिली. आम्हाला यावर बोलता येणार नाही, असे काहींनी सांगितले. ही समस्या कधी दूर होईल, याबाबत काही सांगता येणार नसल्याचे सांगत टपाल अधिकाऱ्यांनी हात वर केले.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.