Quick Commerce: सरलेल्या वर्षात क्विक कॉमर्स क्षेत्रात उलाढाल वाढली

Quick Commerce: सरलेल्या वर्षात झटपट वस्तू,खाद्यपदार्थ पुरविण्यासाठी भारतामध्ये बर्याच क्विक कॉमर्स कंपन्या उदयास आल्या आणि शहरातील ग्राहकांनी या सेवेचा लाभ घेतला असल्याचा अहवाल समोर आला आहे. इतक्या कमी वेळात पुरवठा करण्यामुळे पुरवठादारावर तणाव येतो. यामुळे आता या सेवा काही प्रमाणात मंदावण्याची शक्यता आहे.
हाऊ इंडिया इन्स्टामार्टेड 2025 नावाच्या जाहीर झालेल्या अहवालात मुंबई दिल्ली, बंगळूरु, हैदराबाद या शहरासह पुण्यातील ग्राहकांनीही या सेवेचा बराच लाभ घेतला असल्याची माहिती समोर आली आहे. एका ग्राहकांने या सेवेच्या माध्यमातून 22 लाख रुपये खर्च केले. या ग्राहकाने आयफोन, सोन्याची नाणी इत्यादी बरोबरच दूध, फळे, अंडी इत्यादीची खरेदी केल्याची माहिती समोर आली आहे.
इन्स्टामार्ट वरून ग्राहक केवळ अतिशय गरजेच्याच वस्तू खरेदी करत नाहीत तर भेटवस्तू देण्यासाठी ही या व्यासपीठाचा वापर केला जात आहे. त्याचबरोबर कमी किमतीच्या वस्तूबरोबरच जास्त किमतीच्या वस्तू ही इन्स्टामार्ट वरून खरेदी केल्या असल्याची आकडेवारी समोर आली आहे. बंगळूरु शहर या क्विक कॉमर्स क्षेत्राच्या सेवा घेण्यात आघाडीवर आहे.
पुण्यातही एका ग्राहकाने या सेवासाठी तेरा लाख रुपये खर्च केले असल्याची माहिती समोर आली आहे. संबंधित ग्राहकाने आयफोनसह इतर वस्तू खरेदी केल्या. एका ग्राहकाने पोटॅटो चिप्सवर दीड लाख रुपये खर्च केल्याची माहिती आहे. क्रीडा साहित्य आणि इतर बाबीची विक्री पुण्यात वार्षिक पातळीवर 475 टक्क्यांनी वाढली.
यावर प्रतिक्रिया व्यक्त करताना स्विगी कंपनीचे मुख्य व्यापार अधिकारी हरीकुमार गोपीनाथन यांनी सांगितले की, शहरातील नागरिकांना आपल्या कामासाठी आणि इतर बाबीसाठी धावपळ करावी लागते.
यामुळे क्विक कॉमर्स क्षेत्र या नागरिकांना कमालीचे उपयोगी पडत आहे व या नागरिकांच्या जीवनाचा अविभाज्य घटक बनत चालले आहे. ऐनवेळी उपयोगाच्या वस्तू खरेदी करण्यासाठी सुरुवातीला इन्स्टामार्टचा उपयोग होत होता. मात्र आता या वस्तूबरोबरच महागड्या इतर बाबीही ग्राहक इंस्टामार्ट वरून मागवत आहेत आणि आपली गरज भागवीत आहेत.

