मुंबई – बॉलिवूड अभिनेता ‘बॉबी देओल’ स्टारर वेबसीरिज “आश्रम’चा पहिला सीझन चांगलाच गाजला होता. या सीझनमधील बॉबीच्या अभिनयाचे बरेच कौतुक झाले होते. लवकरच या वेबसीरिजचा दुसरा सीझन अर्थात ‘आश्रम 2′ प्रेक्षकांच्या भेटीस येतोय. दरम्यान, “आश्रम 2’ ही वेब सीरिज प्रदर्शनापूर्वीच वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे.
करणी सेनेने प्रकाश झा यांना कायदेशीर नोटीस पाठवली आहे. धार्मिक भावना, प्राचीन सांस्कृतिक आणि आश्रम धर्म यांच्याविषयी चुकीचा समज पसरविल्यामुळे ही तक्रार दाखल करण्यात आली आहे. ‘आश्रम 2’चा ट्रेलर आणि ही संपूर्ण वेबसीरिजच्या प्रदर्शनावर बंदी घालण्याची मागणी करणी सेनेने या नोटीस मध्ये केली आहे. नुकतंच, आश्रम 2 या वेबसीरिजचा ऑफिशल टिझर प्रदर्शित करण्यात आला होता.
तसंच करणी सेनेने प्रकाश झा यांच्यासोबत ‘एमएक्स प्लेअर’ या ओटीटी प्लॅटफॉर्मलादेखील नोटीस बजावली आहे. या वेब सीरीजमध्ये बॉबी देओल व्यतिरिक्त अदिती पोहनकर, चंदन रॉय सान्याल, दर्शन कुमार, अनुप्रिया गोयंका, अध्ययन सुमन हे कलाकार महत्त्वपूर्ण भूमिकेत झळकणार आहेत. ही सीरिज येत्या 11 नोव्हेंबर रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.