- दिवसभरात तिघांना बाधा
लोणावळा – येथील तुंगार्ली, भांगरवाडी आणि आगवाली चाळ परिसरातील प्रत्येकी एका व्यक्तीचा करोना चाचणी अहवाल मंगळवारी (दि. 28) पॉझिटिव्ह आला आहे. त्यामुळे लोणावळा शहरात एका दिवसात पॉझिटिव्ह अहवाल आलेल्या रुग्णांची संख्या तीन झाली आहे. या तीन रुग्णांमुळे लोणावळा शहरातील करोना बधितांच्या संख्येने अर्धशतक ओलांडले. लोणावळा परिसरातील एकूण रुग्ण संख्या 51 झाली आहे.
प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, लोणावळा शहरातील तुंगार्ली विभागातील एका 35 वर्षीय व्यक्तीचा, तर भांगरवाडी विभागातील एका 50 वर्षीय व्यक्तीचा करोना चाचणी अहवाल मंगळवारी पॉझिटिव्ह आला आहे. या दोघांचे स्वॅब खासगी रुग्णालयात तपासणीसाठी घेण्यात आले होते. याशिवाय रेल्वे कॉलनी, आगवाली चाळ परिसरातील एक 24 वर्षीय महिलेचा तपासणी अहवाल देखील पॉझिटिव्ह आला आहे.
लोणावळा ग्रामीण परिसरातील वरसोली गावातील एक 34 वर्षीय व्यक्तीचा करोना चाचणी अहवाल देखील पॉझिटिव्ह आला आहे. या दोघांचेही स्वॅब तपासणीसाठी कोविड केअर सेंटर, झालावाडी येथे घेण्यात आला होते. कोविड केअर सेंटर, झालावाडी येथून सोमवारी 18 जणांचे स्वॅब करोना चाचणीसाठी घेण्यात आले होते. त्या 18 जणांपैकी 16 जणांचे अहवाल मंगळवारी निगेटिव्ह आले आहेत.
लोणावळेकरांसाठी दिलासादायक वृत्त
शहरात रुग्णसंख्येने अर्धशतक गाठत असताना लोणावळेकरांसाठी एक दिलासादायक वृत्त देखील आले आहे. आज शहरातील पाच करोना बाधित रुग्णांना पूर्णतः बरे झाल्याने कोविड केअर सेंटरमधून डिस्चार्ज देण्यात आला आहे. सद्यस्थितीत लोणावळा शहरात 51 बधितांपैकी सक्रिय रुग्णांची संख्या ही 23 असून, अन्य 25 रुग्ण आतापर्यंत बरे झाल्याने त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. याशिवाय तीन रुग्णांचा मृत्यू झाला आहे.