पुणे जिल्हा | विधानसभेला दोन्ही राष्ट्रवादीत जोरदार टसल

लोणी काळभोर, {बाप्पू काळभोर} – आगामी काळात होणा-या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिरूर-हवेली मतदारसंघातील हवेली तालुक्यातील सोलापूर महामार्गावरील गावांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या दोन्ही गटांत जोरदार टसल सुरू झाली आहे.
त्यामुळेच गेल्या पाच वर्षात आला नाही एवढा कोट्यवधी रुपयांचा निधी पूर्व हवेलीतील गावांमध्ये कागदावर आला. तालुका व जिल्हा पातळीवरील पक्ष संघटनेतील अगणित पदांची खिरापत वाटणेही सुरू झाले आहे.
राज्यात सर्वत्र विधानसभा निवडणुकीचे वारे जोरदार वाहू लागले असून, शिरूर-हवेली विधानसभा मतदारसंघातही इच्छुक उमेदवारांनी तयारी सुरू केली आहे.
उमेदवारी निश्चित नसल्याने इच्छुकांनी अधिकृतपणे प्रचार सुरू केला नसला तरी त्यांची प्रत्येक पावले त्या दृष्टीनेच पडत असून इच्छुकांच्या प्रत्येक पावलातून निवडणूक जवळ आल्याची जाणीव मतदारांना होत आहे.
महाराष्ट्र राज्याच्या विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता येत्या दोन तीन दिवसांत लागण्याची शक्यता आहे. सर्वच राजकीय पक्ष या निवडणुकीच्या तयारीत गुंतले आहेत.
गेल्या पाच वर्षात सामान्य माणसाकडे डोकावूनही न पाहणारे राजकीय पक्ष, राजकीय नेते व विविध पक्षांचे गाव, तालुका, जिल्हा व राज्य पातळीवरील पदाधिकारी यांची पूर्व हवेलीत वर्दळ वाढली आहे.
गणेशोत्सवात विविध गावातील गणेश मंडळांच्या गणपतीची आरती व नवरात्र महोत्सवातील देवीची आरती, क्रीडा स्पर्धा, आधारकार्ड – मतदार नोंदणीचे कॅम्प, धार्मिक पर्यटन यांसारखे छोटे मोठे कार्यक्रम, छोटे मोठे कार्यकर्ते – नेते, पदाधिकारी यांचे वाढदिवस, दशक्रिया विधी आदी कार्यक्रमात राजकीय नेत्यांची उपस्थिती वाढली आहे.
शिरूर-हवेली विधानसभा मतदारसंघात विद्यमान आमदार राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरदचंद्र पवार गट) अशोक पवार, पुणे जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक, भाजपचे प्रदीप कंद व शिवसेनेचे (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) जिल्हाध्यक्ष ज्ञानेश्वर कटके अशी तिरंगी लढत होण्याची चिन्हे आजच्या घडीला दिसत आहेत. एखादे तत्कालिक कारण घडून यातील एखाद्या इच्छुकाचा पक्ष व पक्षाचे चिन्ह बदलू शकते.
निवडणूक पूर्व जनसंपर्काच्या या धामधुमीत भारतीय जनता पक्ष, शिवसेनेचे (उद्धव बाळासाहेब ठाकरे व एकनाथ शिंदे) दोन्ही गट, भारतीय राष्ट्रीय काँग्रेस या पक्षांच्या आघाडीवर ज्ञानेश्वर कटके यांच्यासारखा अपवाद वगळता तुलनात्मक दृष्ट्या शांतता वाटते; मात्र राष्ट्रवादी काँग्रेसच्या (शरदचंद्र पवार व अजित पवार) दोन्ही गटांत पूर्व हवेलीत विशेषत: लोणी काळभोरमध्ये कुरघोडीचे राजकारण जोरदार सुरू आहे.
या दोन्ही गटांनी लोणी काळभोरमध्ये आपल्या पक्षाच्या कार्यकर्त्यांना गाव, तालुका व जिल्हा पातळीवरील वेगवेगळ्या आघाड्या व सेलच्या वेगवेगळ्या पदांचे भरमसाट वाटप गेल्या काही दिवसांत केले आहे.
वेगवेगळ्या विकासकामांसाठीही कोट्यवधी रुपयांचा निधी आमच्या पक्षाच्या नेत्यांनी दिला आहे, असे म्हणत नारळ फोडून, फलक लावून जनतेला सांगितले आहे. दोन चार दिवसात निवडणुकीची आचारसंहिता लागणार आहे.
त्यामुळे जाहीर केलेली ही कामे खरंच पूर्ण होतील का फक्त फलकावर व सोशल मीडियातच राहतील हे आगामी काळात जनतेसमोर येणार आहे; मात्र ही कामे पूर्ण झाल्यानंतरच जनता त्यांच्यावर विश्वास ठेवणार आहे. यात शंका नाही
निवडणूक आली की चमकोगिरी
विधानसभा निवडणूक जवळ आल्याने हे सर्व प्रकार चालू आहेत. गेल्या काही वर्ष बंद असलेला थेऊर येथील यशवंत सहकारी साखर कारखाना, सोलापूर व नगर महामार्गावर होणारी प्रचंड वाहतूक कोंडी,
या दोन्ही महामार्गावर पडलेले खड्डे, गावातील रस्त्यांची झालेली दुर्दशा, पिण्याच्या पाण्याचा प्रश्न, जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळां मधील शिक्षणाचा दर्जा,
प्राथमिक आरोग्य केंद्रामार्फत नागरिकांना मिळणा-या सेवेचा दर्जा आदी प्रश्न गेली अनेक वर्ष तसेच आहेत.
निवडणूक आली की चमकोगिरी करायची, निवडणूक संपली की उर्वरित काळात मतदारांकडे डोकावूनही बघायचे नाही. असा फॉर्म्युला जवळपास सर्वच पक्षांनी अवलंबला आहे. त्यामुळे मतदारही राजकीय पक्ष, नेते, पदाधिकारी यांना गांभीर्याने घेत नाहीत.





