पणजी: गोव्यातील जिल्हा पंचायत निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने विरोधकांचा धुव्वा उडवत दणदणीत विजय संपादन केला आहे. एकूण ५० जागांपैकी ३० जागा जिंकून भाजपने ग्रामीण भागावर आपली पकड मजबूत केली आहे. दुसरीकडे, मुख्य विरोधी पक्ष असलेल्या काँग्रेसला अवघ्या ८ जागांवर समाधान मानावे लागले असून, त्यांची मोठी घसरण झाल्याचे पाहायला मिळत आहे. मतदारांचा कौल भाजपच्या बाजूने २० डिसेंबर रोजी गोव्यातील ५० जिल्हा पंचायत मतदारसंघांसाठी मतदान झाले होते. आज, २२ डिसेंबर रोजी या निवडणुकीचे निकाल जाहीर करण्यात आले. सुरुवातीपासूनच भाजपने अनेक मतदारसंघांत आघाडी घेतली होती, जी शेवटपर्यंत कायम राहिली. राज्य निवडणूक आयोगाने दिलेल्या माहितीनुसार, या निवडणुकीत ७०.८१ टक्के मतदानाची नोंद झाली होती. सुमारे ८ लाख मतदारांपैकी मोठ्या संख्येने मतदारांनी भाजपच्या विकासकामांवर विश्वास दर्शवला आहे. इतर पक्षांची स्थिती – या निवडणुकीत आम आदमी पक्ष (AAP) आणि रिव्होल्युशनरी गोअन्स पार्टी (RGP) यांनी प्रत्येकी २ जागा जिंकून आपले खाते उघडले आहे. तर मगोपला (MGP) २ आणि गोवा फॉरवर्ड पार्टीला (GFP) केवळ १ जागेवर विजय मिळवता आला. ५ जागांवर अपक्ष उमेदवारांनी बाजी मारली आहे. पक्ष विजयी जागा भाजप ३० काँग्रेस ०८ अपक्ष ०५ मगोप ०२ आप ०२ आरजीपी ०२ गोवा फॉरवर्ड ०१ या विजयामुळे भाजप कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण असून, हा विजय आगामी विधानसभा निवडणुकीसाठी बूस्टर डोस ठरेल, असा विश्वास पक्षाच्या नेत्यांनी व्यक्त केला आहे. काँग्रेससाठी मात्र हा निकाल आत्मपरीक्षण करायला लावणारा ठरला आहे.