स्वप्निल काळे पिंपरी: शहरात निवडणुकीचे वारे सध्या जोरदार वाहत आहेत. उमेदवारांकडून पत्रक वाटप चौकाचौकांत बॅनर्स, सोशल मीडियावर जाहिराती आणि सभांमधून घोषणांचा भडीमार सुरू आहे. मात्र या साऱ्या गदारोळात विकासापेक्षा प्रतिमानिर्मिती आणि कामापेक्षा एकमेकांवरील टीकास्त्रांनाच अधिक महत्त्व दिले जात असल्याचे चित्र ठळकपणे दिसून येत आहे. प्रत्येक इच्छुक उमेदवार आपली चांगली प्रतिमा जनतेसमोर मांडण्याच्या प्रयत्नात आहे. आपण किती स्वच्छ, प्रामाणिक आणि जनतेसाठी झटणारे आहोत, हे सांगण्यासाठी शब्दांची जुळवाजुळव केली जात आहे. निवडणूक जवळ येताच राजकीय मैदानात टीकास्त्रांचा अक्षरशः मारा सुरू झाला आहे. आरोप-प्रत्यारोप, जुने मुद्दे उकरून काढणे, वैयक्तिक पातळीवर हल्ले करणे, या सगळ्यामुळे निवडणूक ही विचारांची नव्हे तर आरोपांची लढाई बनत चालली आहे. या आरोप-प्रत्यांरोपांमुळे मतदारांंच्या प्रतिनिधींकडून असणाऱ्या अपेक्षांकडे दुर्लक्ष केले जाते. त्यामुळे मतदारांनी नेमके काय ऐकावे आणि कोणाला विचारावे हा प्रश्न अनुत्तरितच ठरतो. सत्तेत आल्यावर गल्लीतही न फिरकणारे आता मतांसाठी घरोघरी जाऊन कुठलीही लाज न बाळगता मतदारांचे पाय धरत आहेत. हे दृष्य हास्यास्पद असले तरीही चिंतन करण्यासारखे आहे. जनतेच्या आशिर्वादापेक्षा स्वतः केलेल्या विकासकामांच्या बळावर निवडणुक लढवण्यासाठी आज कोणीही समोर येत नाही. मतदारांनी टीकास्त्रांच्या झगमगाटात अडकून न पडता, प्रतिमेपलीकडे जाऊन कोणते काम झाले, कोणते रखडले, हे प्रश्न विचारण्याची गरज आहे. मतदान हा केवळ अधिकार नाही, तर शहराच्या भवितव्याबाबतचा निर्णय आहे. त्यामुळे यावेळी भावनिक भाषणांपेक्षा ठोस कामगिरी, आरोपांपेक्षा उत्तरदायित्व आणि प्रतिमेपेक्षा वास्तव पाहून निर्णय घेण्याची वेळ मतदारांवर आली आहे. कारण शेवटी निवडून येणारे प्रतिनिधी बदलू शकतात, पण त्यांच्या निर्णयांचा परिणाम शहराला दीर्घकाळ भोगावा लागतो. निवडणुकीच्या काळात विकासासाठी एवढा आक्रोश करणारे नेते सत्तेत आल्यानंतर कुठे जातात? रस्ते, पाणीपुरवठा, स्वच्छता, आरोग्य, शिक्षण या मूलभूत प्रश्नांसाठी जेवढे प्रयत्न प्रतिमा जपण्यासाठी केले जातात, तेवढे प्रयत्न सत्तेत असताना का दिसत नाहीत? मतदारांना केवळ भाषणांपुरते आणि जाहिरातींपुरतेच महत्त्व दिले जाते का, असा सवाल आता उपस्थित होत आहे. पक्षांतर तुपाशी, पक्षनिष्ठा उपाशी उमेदवारीसाठी पक्षांतर करणाऱ्यांची संख्या झपाट्याने वाढली असताना निष्ठावंत कार्यकर्ता मात्र बाजूला पडला आहे. वर्षानुवर्षे पक्षासाठी झटणारा, घराघरांत पक्ष पोहोचवणारा कार्यकर्ता दुर्लक्षित राहतो आणि केवळ जिंकण्याची प्रतिमा असलेल्यांनाच संधी दिली जाते. यामुळे राजकारणात निष्ठा, मूल्ये आणि प्रामाणिकपणा यांचे स्थान कमी होत चालल्याचे समोर आले आहे.