मद्यधुंद अवस्थेत ‘शिवशाही’ चालविणारा ताब्यात

पुणे – दारुच्या नशेत रॉंग साईडने बेदरकारपणे महाबळेश्‍वरच्या दिशेने शिवशाही घेऊन निघालेल्या बसचालकास स्वारगेट वाहतूक पोलिसांनी पकडले. त्याची तपासणी केली असता त्याने मोठ्या प्रमाणात दारुचे सेवन केल्याचे समोर आले आहे. यावेळी बसमध्ये 45 प्रवासी होते.

पवन जगन तोडकर असे या शिवशाही चालकाचे नाव आहे. स्वारगेट स्थानक परिसरात रविवारी वाहतूक पोलिसांकडून खासगी वाहनांवर कारवाई सुरू होती. यावेळी साडेसहाच्या सुमारास एक चालक स्थानकाच्या प्रवेशव्दारातून बेदरकारपणे शिवशाही घेऊन बाहेर जात असल्याचे वाहतूक पोलिसांच्या निदर्शनास आले. यावेळी तत्काळ बस थांबवून तोडकर याची विचारपूस केली असता तो दारुच्या नशेत असल्याचे आढळले. तसेच, त्याची ब्रेथ ऍनालायझरव्दारे तपासणी केली असता तो मद्यधुंद असल्याचे समोर आले. पोलिसांनी ही बाब एसटीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून दिली. पोलिसांनी तोडकर याच्यावर ड्रंक ऍन्ड ड्राईव्ह, रॉंग साईड आणि रॅश ड्रायव्हिंगची कारवाई केली असून त्याच्यावर खटला दाखल करण्यात आला आहे.

चालकावर ड्रंक ऍन्ड ड्राईव्ह, रॉंग साईड आणि रॅश ड्रायव्हिंगची कारवाई करण्यात आली आहे. ब्रेथ ऍनालायझरव्दारे तपासणी केली असता त्याने प्रमाणापेक्षा जास्त दारू सेवन केल्याचे निष्पन्न झाले. तसेच, चालकाकडे लायसन्स देखील नाही.
– प्रभाकर ढगे, वाहतूक पोलीस निरीक्षक, स्वारगेट


चालक दारुच्या नशेत बस चालवत असल्याचे पोलिसांच्या तपासणीत समोर आले असेल, तर त्याच्यावर महामंडळाच्या नियमानुसार सक्त कारवाई करण्यात येईल.
– यामिनी जोशी, विभागीय नियंत्रक, एसटी महामंडळ, पुणे

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.