पिंपरी | मारहाण प्रकरणी वर्षभरानंतर गुन्हा दाखल

पिंपरी, (प्रतिनिधी) – बेस बॉलच्या बॅटने केलेल्या मारहाणीत एकाच्या बरगडीचे हाड फॅक्चर झाले होते. याप्रकरणी तब्बल वर्षभरानंतर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रावेत येथे ही घटना घडली होती.
जनरैल सिंग बोपाराय (वय ५५, रा. सिलेस्टीयल सिटी, मुकाई चौक) यांनी याबाबत शुक्रवारी (दि. २०) रावेत पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी देवेंद्र राजेंद्र शेवकरी (वय ४०, रा. सिलेस्ट्रीयल सिटी, मुकाई चौक) याच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.
ही घटना १९ सप्टेंबर २०२३ रोजी सिलेस्टीयल सिटी सोसायटीच्या पार्किंगमध्ये घडली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, १९ सप्टेंबर २०२३ रोजी रात्री सव्वा अकरा वाजताच्या सुमारास फिर्यादी बोपाराय यांनी आरोपी शेवकरी यांना कृपया आपली गाडी काढा, मला माझी गाडी पार्क करायची आहे, असे सांगितले.
या कारणावरून आरोपी शेवकरी याने फिर्यादी यांना शिवीगाळ करीत कानाखाली मारली. त्यानंतर लाथा बुक्क्यांनी मारहाण करीत गाडीतून बेस बॉलची बॅट काढून फिर्यादी यांच्या पाठीवर व कमरेवर जोराने मारून बरगडीचे हाड फॅक्चर केले.
फिर्यादी यांनी याबाबत न्यायालयात धाव घेतल्यानंतर वडगाव मावळ न्यायालयाच्या आदेशानंतर रावेत पोलिसांनी गुन्हा नोंद केला. रावेत पोलीस याबाबत अधिक तपास करीत आहेत.





