तालुक्‍यात 40 हून अधिक गावांत बिबट्याची डरकाळी

पाच वर्षात तीनशे पाळीव जनावरांचा फडशा; बिबट्या संवर्धन केंद्र प्रकल्पाची आवश्‍यकता
उमेश सुतार

कराड – कराड तालुक्‍यात सुमारे चाळीसपेक्षा जास्त गावात बिबट्याच्या सुरु असलेल्या डरकाळीने सारा गाव भितीच्या छायेत असून शिवारामधील बिबट्याच्या मुक्तसंचाराने नागरिकांनाही सातच्या आत घराचा रस्ता धरावा लागत आहे. बिबट्यांच्या डरकाळीच्या ठिकठिकाणच्या नोंदी वन विभागाकडे झालेल्या असल्या तरी त्याला संरक्षण देण्यासाठी वन खात्याने बिबट्या संवर्धन केंद्रासारखा प्रकल्प येथे आणण्याची गरज असल्याचे तज्ञ लोकांमधून बोलले जात आहे.

कराड तालुक्‍यात गावागावात नागरीवस्तीत होणारी वाढ लक्षात घेता लोकांनी आपली घरे शिवारात हवेशीर ठिकाणी बांधलेली आहेत. त्यातच शेतीपूरक व्यवसाय करत असल्याने दुधदुभती जनावरेही शिवारातच चांगल्या प्रकारचे गोठे बांधून पाळली आहेत. या पशुधनावरच शेतकऱ्यांचे आर्थिक नियोजन सुरु असते. सहाजिकच मानवाने शिवारांमधून घरे बांधून एक प्रकारे वन्यप्राण्यांच्या काही अंशी अधिवासातच अतिक्रमण केल्याची परिस्थिती निर्माण झाली आहे.

तसेच डोंगरभागात सर्वत्रच मोठ्या प्रमाणात होणाऱ्या वृक्षतोडीमुळे वन्यप्राण्यांच्या अधिवासाची ठिकाणे भकास होवू लागली आहेत. त्यामुळे जंगलातील हे वन्यप्राणी अन्न, पाण्याच्या शोधात मानवी वस्तीकडे आपला मोर्चा वळवत आहेत. आतापर्यंतच्या पाच वर्षांच्या कालावधीमध्ये सुमारे 300 पाळीव प्राणी बिबट्याच्या हल्ल्यात ठार झाल्याच्या घटनांची वनखात्याच्या दप्तरी नोंद झालेली आहे. जंगलात बिबट्याला खाद्य मिळत नसल्याने तो नागरी वस्तीकडे वळत आहे, मात्र याच्या मुक्तपणे संचारामुळे नागरिकांमधून धास्ती वाढू लागली आहे. याचा परिणाम भविष्यात मानव विरुद्ध बिबट्या असा संघर्ष अधिक तीव्र होईल, अशीही स्थिती निर्माण होवू लागली आहे. यासाठी यावर योग्य पर्यायी व्यवस्था शोधण्यासाठी वनखात्याने विशेष प्रयत्न करणे गरजेचे असल्याची मागणी प्राणीमित्र, निसर्गप्रेमींमधून होत आहे.

कराड तालुक्‍यात प्रामुख्याने येणके, तांबवे, विंग, पाठरवाडी, आणे या भागात बिबट्याचा जास्त वावर असल्याचे दिसून येत आहे. पण हे बिबटे सुरुवातीला गावाकडे येत नव्हते. डोंगर परिसरातच त्यांचा अधिवास होता. मात्र अलीकडच्या काळात बिबट्याच्या पाळीव जनावरांवरील हल्ल्यांचे प्रमाण वाढले आहे. आगाशिवच्या डोंगरात गडाच्या डोंगराई देवीच्या परिसरात बिबट्याची वस्तीच झाली आहे. त्यामुळे हे बिबटे रात्रीच्या सुमारास डोंगर उतरुन आगाशिवनगर, जखिणवाडी, नांदलापूर, काले, धोंडेवाडी, ओंडमार्गे तालुक्‍याच्या अन्य भागातही मुक्तपणे शिवारात फिरुन पाळीव प्राण्यांची शिकार करत असतात.

तालुक्‍यातील वन विभागाच्या हद्दीत 13 हजार 153 हेक्‍टर क्षेत्र आहे. त्यासाठी मलकापूर, कोळे, वराडे व मसूर अशी परिमंडले देखभालीसाठी आहेत. तर चारपैकी तीन परिमंडलात बिबट्याचा मुक्त संचार आहे. सुमारे सत्तरपेक्षाही जास्त ठिकाणी बिबट्याचा वावर रोजचा झाला आहे. वन विभागाच्या बिटनिहाय बिबट्याचे क्षेत्र वाढत आहे. मलकापूरात 770 हेक्‍टर, नांदगावात 728, कोळेच्या बिटात एक हजार 40, कासारंशिरबेत 588, तांबवेत 900, म्हासोलीत 833, वराडेत एक हजार तीनशे, म्होप्रे येथे 916 तर चोरेत 950 हेक्‍टरच्या क्षेत्रात बिबट्याचा वावर असल्याची नोंद वन विभागाने घेतली आहे.

पाच वर्षांत बिबट्याने नागरी वस्तीत शिरुन मारलेल्या जनावरांची संख्या 300 वर पोचली आहे. त्यातील सुमारे 250 जनावरांच्या बदल्यात वन खात्याने 10 लाख 50 हजारांची नुकसानभरपाई दिली आहे. चाळीसपेक्षा जास्त गावातील डोंगर पायथा, पाळीव जनावरांच्या गोठ्याचा परिसर येथे दिसणारा बिबट्या आता मानवीवस्तीतील कॉलन्यातही दिसू लागला आहे. गावाच्या वेशीवर त्याचे दर्शन होवू लागले आहे.

कराड तालुक्‍यातील चाळीस पेक्षा जास्त गावात बिबट्याचा चांगलाच वावर वाढला आहे. बऱ्याच वेळा हे बिबटे वनक्षेत्रात चरायला जाणाऱ्या पाळीव जनावरांवर हल्ले करत असतात. दिवसेंदिवस या बिबट्यांचा आधिवास वाढत चालला असल्यामुळे कराड तालुक्‍यातील शिवारामधून या बिबट्याचे आपल्या बछड्यांसह वारंवार शेतकऱ्यांना दर्शन होवू लागले आहे.

रोहन भाटे ,पर्यावरण अभ्यासक

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.