श्रीगोंद्यात जिल्हा परिषदेचे तीस वर्ग भरतात उघड्यावर..!

समीरण बा. नागवडे
श्रीगोंदा – तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या 19 प्राथमिक शाळांमधील तब्बल तीस वर्ग उघड्यावर भरविले जात असल्याची धक्कादायक आकडेवारी समोर आली. या तीस वर्गांसाठी पंचायत समितीच्या शिक्षण विभागाने जिल्हा परिषदेकडे पत्तीस वर्गखोल्यांची मागणी केली आहे.
तालुक्यात जिल्हा परिषदेच्या 365 प्राथमिक शाळा आहेत. या शाळांमध्ये जवळपास साडेसोळा हजार विद्यार्थी विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. या शाळांपैकी 19 शाळांचे तब्बल 30 वर्ग उघड्यावर भरत आहेत. शिक्षण विभागाच्या माहितीनुसार 30 वर्गांतील जवळपास पाचशे विद्यार्थी उघड्यावर शिक्षण घेत आहेत. जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाने पंचायत समितीच्या शिक्षण विभागाकडून मागविलेल्या आकडेवारीतुन ही माहितीसमोर आली आहे.
या आकडेवारीनुसार ढोकराई फाटा, श्रीगोंदा रस्ता, पिसोरेखांड, वेळू, यवती, महादेववाडी (टाकळीलोणार), साबळेमळा, भोरमाळ, आर्वी या नऊ शाळांचे चौदा वर्ग मंदिरामध्ये भरत आहेत. तर बाबूर्डी, जगतापमळा (कोळगाव), वाघरखेलवाडी, निमजेवाडी, काष्टी, निमगाव खलू या सहा शाळांचे 11 वर्ग झाडाखाली भरविले जात आहेत. तर चौधरीमळा (काष्टी), गव्हाणेवाडी या दोन शाळांचे दोन वर्ग निर्लेखन झालेल्या जुन्या वर्ग खोल्यांच्या पडवीमध्ये भरविले जात आहेत. अशाप्रकारे 19 शाळांच्या 30 वर्गांमधील जवळपास पाचशे विद्यार्थी उघड्यावर शिक्षण घेत आहेत.
दरम्यान, एकीकडे शाळा डिजीटल करण्याचा मानस शासनाकडून व्यक्त केला जात आहे. मात्र त्याचवेळी काही विद्यार्थ्यांवर आजही उघड्यावर शिक्षण घेण्याची नामुष्की ओढावत आहे. या बाबीकडे शिक्षण विभागाने गांभीर्याने बघण्याची गरज असून त्यासाठी जिल्हा पातळीवरून हालचाली होणे अपेक्षित आहे.
पंचायत समितीच्या शिक्षण विभागाने 19 शाळांसाठी 34 वर्गखोल्यांना मंजुरी देण्याचा प्रस्ताव जिल्हा परिषदेकडे पाठविला आहे. लवकरच वर्गखोल्या मंजूर होतील.
– राम जगताप, गटविकास अधिकारी





