Karnataka : मोदींची डिनर डिप्लोमसी ठरली औत्सुक्याचा विषय; अभिनेते, क्रिकेटपटू अन् उद्योगपतींशी….

बंगळुरू – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची कर्नाटक दौऱ्यातील डिनर डिप्लोमसी औत्सुक्याचा विषय बनली आहे. भोजन समारंभाचे औचित्य साधून मोदींनी कन्नड अभिनेते, आजी-माजी क्रिकेटपटू आणि उद्योगपतींशी संवाद साधला. कर्नाटकमधील विधानसभा निवडणूक अवघ्या दोन महिन्यांवर येऊन ठेपल्याने त्या घडामोडीचे महत्व वाढले आहे.
बंगळुरूमधील राजभवनात रविवारी रात्री मोदींनी विविध क्षेत्रांमधील मान्यवरांसमवेत भोजनाचा आस्वाद घेतला. त्या मान्यवरांमध्ये यश, ऋषभ शेट्टी या अभिनेत्यांचा, अनिल कुंबळे, जवागल श्रीनाथ, व्यंकटेश प्रसाद या माजी क्रिकेटपटूंचा आणि मयंक आगरवाल, मनिष पांडे या क्रिकेटपटूंचा समावेश होता.
भोजन समारंभाला उपस्थित राहिलेल्या मान्यवरांशी मोदींनी कन्नड भाषा, संस्कृती, सिनेमा, रंगभूमी, क्रीडा, व्यवसाय संधी यांसारख्या विविध मुद्द्यांवर चर्चा केल्याची माहिती सुत्रांनी दिली.
एअरो इंडिया प्रदर्शनाच्या उद्घाटनासाठी मोदी कर्नाटक दौऱ्यावर आले होते. त्या दौऱ्यातील मोदींची डिनर डिप्लोमसी अनेकांच्या भुवया उंचावणारी ठरली आहे. कर्नाटकात एप्रिल-मेमध्ये विधानसभा निवडणूक अपेक्षित आहे. ती जवळ येऊन ठेपल्याने सत्तारूढ भाजपने जय्यत तयारी सुरू केली आहे. त्यामुळे विविध क्षेत्रांतील मान्यवरांपर्यंत पोहचण्याच्या भाजपच्या प्रयत्नांचा भाग म्हणून मोदींनी साधलेल्या संवादाकडे पाहिले जात आहे.







