पिंपरी – प्रशस्त रस्ते, उड्डाणपूल, आयटी पार्क, शैक्षणिक संस्थांसह मूलभूत सुविधा उत्तम दर्जाच्या असलेल्या पिंपरी-चिंचवड शहरात वास्तव्यास नागरिकांची मोठी पसंती मिळत आहे. गेल्या सहा वर्षांत शहरातील मालमत्ता साडेचार लाखांवरून पावणेसहा लाखांवर पोहोचल्या आहेत. तब्बल 1 लाख 20 हजाराने मालमत्तांमध्ये वाढ झाली आहे. एकीकडे निवासी, बिगर निवासी इमारतींमध्ये वाढ होत असताना उद्योगनगरी अशी ओळख असणाऱ्या पिंपरी-चिंचवडमध्ये सहा वर्षांत औद्यगिक इमारतींच्या संख्येत अवघी 437 इतकीच भर पडली आहे. मिळकतींमध्ये मोठी वाढ होत असल्याने महापालिकेच्या उत्पन्नातही मोठी वाढ झाली असून 2021-22 या आर्थिक वर्षात मालमत्ता करातून पालिकेला 625 कोटी रूपयांचे भरघोस असे उत्पन्न मिळाले आहे. औद्योगिकनगरी, स्मार्ट सिटी ते मेट्रो सिटी अशी ओळख होऊ लागलेल्या पिंपरी-चिंचवड शहर लोकसंख्या वाढीमध्ये वरच्या क्रमाकांवर आहे. शहरात पायाभूत सुविधा उत्तम दर्जाच्या आहेत. शहराच्या विविध भागात झालेले प्रशस्त रस्ते, उड्डाणपुल, उद्याने, क्रिडांगणे, जलतरण तलाव आदी महत्वाची विकास कामे झाली आहेत. तसेच पिंपरी-चिंचवड औद्योगिक परिसरालगतच हिंजवडी आयटी पार्क, तळवडे आपटी पार्क, चाकण, रांजणगाव एमआयडीसी हा भाग येतो. या भागात अनेक बहुराष्ट्रीय कंपन्या आहेत. त्यामुळे या भागातील कामगार वर्ग वास्तव्यासाठी पिंपरी-चिंचवड शहराला प्राधान्य देत आहे. त्यामुळे शहरात सध्या 5 लाख 71 हजार 157 मालमत्ता आहेत. पालिकेच्या उत्पन्नातही वाढ शहराच्या चारही बाजून टोलेजंग प्रकल्प साकारले जात आहेत. यामध्ये प्रामुख्याने रावेत, वाकड, पुनावळे, ताथवडे, पिंपळे निलख, पिंपळे सौदागर, मोशी, चऱ्होली आदी भाग सर्वाधिक विकसित होत आहे. संपूर्ण देशभरातून शहरात वास्तव्यास येणाऱ्या नागरिकांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. कामगार वर्ग एमआयडीसीलगतच्या पिंपरी-चिंचवड महापालिका हद्दीत बांधकामांचे प्रमाण वाढले आहे. गुंठा, दोन गुंठा जागा घेऊन शहरात बांधकाम करण्याऱ्यांचेही प्रमाण मोठे आहे. शहरात 2017 मध्ये निवासी, औद्योगिक, मोकळी जागा अशा साडेचार लाख मिळकती होत्या. सहा वर्षांत औद्योगिक मिळकतीसह निवासी मिळकतींच्या संख्येमध्ये मोठी वाढ झाली असून सव्वा लाख मिळकती वाढल्या आहेत. त्यामुळे महापालिकेच्या उत्पन्नातही दिवसेंदिवस वाढ होत आहे.