सिंधुदुर्ग : मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेसाठी शासनाने ऑनलाइन अर्ज भरण्यासाठी नारीशक्ती ॲप उपलब्ध करून दिले. गत चार ते पाच दिवसांपासून मात्र हे ॲप सुरूच होत नसल्याचे दिसून येत आहे. ॲपवर क्लिक करूनही कसलाच प्रतिसाद मिळत नाही. त्यामुळे अर्ज दाखल करण्याच्या तयारीत असलेल्या महिलांची झोप उडाली आहे. ऑनलाइन अर्ज भरण्याबरोबरच अंगणवाडी सेविकांमार्फतही महिलांना फॉर्म भरता येत आहेत. त्यासाठी सर्व कागदपत्रे सेविकांकडे जमा करायची असून, सध्या हजारो महिलांनी आपली कागदपत्रे सेविकांकडे सुपूर्द केली आहेत. मात्र, ॲप सुरूच होत नसल्याने सेविकांचीही पंचाईत झाली आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे फॉर्म ऑनलाइन भरण्याची सोय आहे. मात्र, ज्या ॲप्लिकेशनवर अर्ज सादर करायचे, तेच ॲप ‘सर्व्हर डाऊन’मुळे व्यवस्थितरीत्या चालत नाही. परिणामी, लाडक्या बहिणींची झोप उडाली आहे. मध्यरात्री अर्ज भरावे लागत असल्याने अंगणवाडी सेविकांना जागरण करावे लागत आहे, तसेच ओटीपीसाठी त्यांना रात्रीचीच फोनाफोनी करावी लागत आहे. दिवसभर ॲप चालत नाही. रात्री उशिरा सेविकांना अर्ज भरण्याचे काम करावे लागत आहे. रात्री एक ते दोन वाजेपर्यंत हा फाॅर्म भरण्यासाठी खटपट करावी लागते. तसेच ग्रामीण भागात इंटरनेट नेटवर्क बाबतीत अडथळे पार करून हे करावे लागत आहे. दरम्यान, सिंधुदुर्ग जिल्ह्यात या योजनेत एक लाख ३६ हजार ५२७ लाभार्थी पात्र ठरले आहेत, असे प्रशासनाने म्हटले आहे.