शिरूर तालुक्यात लाडकी बहिण योजनेअंतर्गत फॉर्म भरुन घेण्यासाठी गाव निहाय आराखडा तयार

शिरूर – महाराष्ट्र शासन, महिला व बालविकास विभाग यांचेकडील दि.२८जून व दि.३ जुलैच्या सुधारीत शासन निर्णयान्वये महाराष्ट्र राज्यात “मुख्यमंत्री-माझी लाडकी बहिण” योजना लागू करण्यात आलेली आहे. या “मुख्यमंत्री-माझी लाडकी बहिण” योजनेच्या अंमलबजावणीच्या अनुषंगाने शिरुर तालुक्यांतर्गत तहसिल कार्यालय शिरुर, पंचायत समिती कार्यालय शिरुर व एकात्मिक बालविकास सेवा योजना प्रकल्प कार्यालय शिरुर यांच्या संयुक्त विद्यमाने गाव पातळीवर पात्र लाभार्थी महिलांचे ऑफलाईन व ऑनलाईन फॉर्म भरुन घेण्यासाठी गाव निहाय आराखडा तयार करण्यात आलेला आहे. त्या दृष्टीने आवश्यक नियोजन करण्यात आलेले आहे.
नियोजनानुसार तलाठी, ग्रामसेवक, अंगणवाडी सेविका, संबंधित ई सेवा केंद्र, समूह संसाधन केंद्र यांचे मार्फत दि.४ जुलै २०२४ पासून प्रत्यक्ष ऑफलाईन व ऑनलाईन फॉर्म भरुन घेण्याची कार्यवाही सुरु झालेली असून तालुक्यातील एकुण ९६ ग्रामपंचायत स्तरावर दि.९ जुलै पासून दैनंदिन शिबिरांचे आयोजन करण्यात आलेले असून योजनेची प्रभावी अंमलबजावणी सुरु आहे. सदर गावांमध्ये आज अखेर एकुण १२४६० ऑफलाईन व ऑनलाईन फॉर्म भरुन घेण्यात आलेले आहेत. फॉर्म भरुन घेत असताना महिलांचा उत्स्फुर्त प्रतिसाद लाभत असून केलेल्या नियोजनाबाबत ग्राम स्तरावर समाधान व्यक्त केले जात आहे.
प्रांत आधिकारी स्नेहा किसवे-देवकाते, शिरूर तहसिलदार बाळासाहेब म्हस्के यांचे संपूर्ण कामकाजावर नियंत्रण असून त्यांचे मार्गदर्शनाखाली गटविकास अधिकारी शिरुर महेश डोके, प्रकल्प अधिकारी निर्मला चोभे, एकात्मिक बालविकास सेवा योजना प्रकल्प कार्यालय शिरुर, वैशाली सटाले, प्रकल्प अधिकारी, एकात्मिक बालविकास सेवा योजना प्रकल्प कार्यालय शिरुर, संगिता बेंगाळ, सहाय्यक प्रकल्प अधिकारी एकात्मिक बालविकास सेवा योजना प्रकल्प कार्यालय शिरुर व ग्रामस्तरावरील अधिकारी, कर्मचारी हे कामकाज करत आहे.


