संगमनेर – संगमनेर शहरासह ग्रामीण भागातील घारगाव, बोटा, चंदनापुरी, तळेगाव, धांदरफळ, निमज गावांसह अनेक गावांमध्ये निसर्ग चक्रीवादळाचा तडाखा बसला. तालुक्यांतील अनेक गावांत जोरदार वाऱ्यासह पडलेल्या पावसामुळे अनेक झाडे उन्मळून पडली. घरे, प्राथमिक शाळांवरील पत्रे उडून गेली. तर बोरबन येथील एक व्यक्ती घराची भिंत पडून जखमी झाली असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले. निसर्ग चक्रीवादळ व पाऊसामुळे तालुक्यात सर्व भागात नुकसान झाले असून ग्रामीण भागातच चक्रीवादळाचा मोठ्या प्रमाणात फटका बसला आहे. तालुक्यातील ज्या ठिकाणी नुकसान झाले आहे. त्या ठिकाणचे पंचनामे करण्याचे आदेश देण्यात आलेले असल्याचे तहसीलदार अमोल निकम यांनी सांगितले. अनेक गावात घरांचे पत्रे उडाले, भिंती पडल्या, डाळिंबाचे फूल व फळ पडले, कणसे असलेली मक्याची झाडे वजनामुळे भुईसपाट झाले. जनावरांचे गोठे पडले, बहुतांशी प्रत्येक गावात वीजेचे खांब पडून विजेच्या तारांचे नुकसान झाले आहे. तसेच सुसाट वाऱ्यामुळे रस्त्यावर अनेक झाडे उन्मळून पडले आहेत. पडलेली झाडे काढण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभाग व शेतकरी यांच्या जेसीबीच्या साहाय्याने झाडे बाजूला करून वाहतुक सुरळीत करण्यात आली. साधारणपणे ग्रामीण भागात 360 कच्ची घरे पडली असून बोरबन येथील एक व्यक्ती घराची भिंत पडून जखमी झाला असल्याची माहितीही निकम यांनी दिली. निसर्ग चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर शहर तसेच ग्रामीण भागातील वीजपुरवठा खंडित करण्यात आला होता. बहुतेक गावांमध्ये विजेचे खांब पडले असून जोराच्या वाऱ्यामुळे विजेच्या तारही पडल्यात. तालुक्यातील निम्म्याहून अधिक गावांचा वीजपुरवठा खंडित झाला असून पूर्वपदावर येण्यासाठी एक ते दोन दिवस लागू शकतात, अशी माहिती वीज वितरण महामंडळाने सांगितले आहे. दुपारी दोननंतर तालुक्यात वादळी वाऱ्यासह पावसाला सुरुवात झाली. सायंकाळी वाऱ्याचा आणि पावसाचा जोर अधिक होता. त्यानंतर रात्री उशिरापर्यंत वादळाचा जोर कायम होता. संगमनेर शहरातील काही भाग, तालुक्यातील घारगाव, बोटा, अकलापूर, निमगाव पागा, धांदरफळ, निमज, सुकेवाडी, आंबी खालसा, वनकुटे आदी गावांमध्ये तसेच पुणे नाशिक महामार्गावर अनेक झाडे पडली. अकलापूर येथील तीन ते चार गावकऱ्यांच्या घरांची पत्रे उडाले. त्यांना प्रशासनाने सुरक्षित स्थळी हलविले होते. घारगाव येथे प्राथमिक आरोग्य केंद्राबाहेर उभी असलेल्या रुग्णवाहिकेवर झाड पडल्याने रुग्णवाहिकेचे मोठे नुकसान झाले. सर्वाधिक आंब्याची झाडे पडून अंगणात अक्षरशः आंब्याचा सडाच पडला होता.