शिरुर (तेजस फडके) – शिरुर तालुक्यातील पंचंतारांकित औद्योगिक वसाहत असलेल्या रांजणगाव MIDC तील स्थानिक तसेच बाहेरचे भंगार व्यावसायिक यांनी औद्योगिक वसाहतीतुन आणलेला धोकादायक कचरा कोणत्याही स्वरुपाची प्रक्रिया न करता रात्रीच्या वेळेस जाळून टाकण्याचा सपाटाच लावला असुन त्यामुळे सर्व सामान्य नागरीकांना विनाकारण त्रास होत आहे. तसेच धुरामुळे आसपासच्या परीसरातील झाडे, पशुपक्षी यांच्यासह मानवी जीवनावर याचा विपरीत परिणाम होऊ लागला आहे. परंतु प्रदुषण नियंत्रण महामंडळाचे अधिकारी मात्र याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असल्याचे चित्र पाहवयास मिळत आहे.
रांजणगाव औद्योगिक वसाहतीत अनेक स्थानिक राजकीय पुढाऱ्यांचेच भंगार गोळा करण्याचे ठेके आहेत. हे ठेके मिळविण्यासाठी अनेकवेळा जीवघेणा संघर्षही झालेला आहे. रांजणगाव MIDC तील अनेक कंपन्यामध्ये मोठ्या प्रमाणात विविध प्रकारचे भंगार तसेच कचरा गोळा करुन ते कारेगाव, रांजणगाव तसेच ढोकसांगवी या परीसरातील मोकळ्या जागेत साठवले जाते. त्यात काही कचरा हा धोकादायक स्वरुपाचा असतो. त्याची योग्य प्रकारे विल्हेवाट लावण्याची जबाबदारी हि कंपनी किंवा संबंधित ठेकेदाराची असते. परंतु हे ठेकेदार हा धोकादायक कचरा रात्रीच्या वेळेस मोकळ्या जागी किंवा निर्जनस्थळी टाकुन पेटवून देतात. त्यामुळे प्रचंड मोठया प्रमाणात प्रदूषण होऊन आसपासच्या लोकांना त्याचा त्रास होत आहे.
रांजणगाव गणपती येथील फंडवस्ती जवळ गेल्या अनेक दिवसांपासुन असाच धोकादायक कचरा जाळण्याचे प्रकार सुरु आहेत. मात्र यामुळे या परीसरातील जनजीवन विस्कळित होऊ लागले असुन जाळलेल्या कचऱ्याच्या धुराचा थेट पशुधन, झाडे तसेच मानवी जीवनावर परिणाम होऊ लागला आहे. त्यामुळे महाराष्ट्र राज्य प्रदुषण नियंत्रण महामंडळाने या संबंधित भंगार व्यावसायिकांवर कारवाई करावी अशी मागणी प्रताप फंड व विवेकानंद फंड यांनी केली आहे.