पुणे जिल्हा | पुरंदर तालुक्यात भाद्रपती बैलपोळा उत्साहात साजरा

सासवड, (प्रतिनिधी) – पुरंदरच्या अनेक भागात भाद्रपती बैलपोळ्या निमित्त ढोल-ताशांच्या गजरात बैलांच्या मिरवणूक काढून सण उत्साहात साजरा करण्यात आला.
या पारंपरिक सणाला देखील ग्रामीण भागांमध्ये मोठे महत्त्व आहे. यांत्रिकीकरणामुळे सर्वत्र बैलांची संख्या दिवसेंदिवस कमी होते आहे.
शेतकरी अजूनही आर्थिक चक्रात गुरफटलेले असला तरीही होणारा हा सण बैलांची मिरवणूक काढत आनंदाने साजरा करण्यात आला.
पुरंदरच्या पूर्व भागासह सासवड येथे होत असलेल्या सणासाठी दुकानात झुली, बाशिंगे, पायातील चाळ, बेगडपट्टी, हिंगुळ, घुंगुरमाळ, सुतदोरी, शेंब्या, आसूड, विविधरंगी कासरे, दृष्टमाळ, रंग आदी साहित्य विक्रीला होते.
सासवडसह तालुक्यातील बाजारपेठा आठ दिवसांपासून सजलेल्या होत्या. गावागावांतून बैलांची संख्या कमी होत असल्याने मातीच्या बैलांना मागणी वाढली होती.
तर बैल जोडीचे घरीच पायावर पाणी घालून त्याच बरोबर पुरणपोळीचा नैवेद्य देऊन घरच्या महिलांनी बैलाचे औक्षण केले असल्याचे सासवड नगरपालिकेचे उपनगराध्यक्ष कै. रामभाऊ वढणे यांचे बंधु दत्तात्रय वढणे यांनी सांगितले.
शेतकरी ज्याच्या जीवावर शेतशिवार फुलवायचे त्या सर्जा-राजाचा हा पोळा सण सुद्धा उत्साहात होणे गरजेचे असल्याचे भाजपाचे सासवड शहराध्यक्ष संतोष जगताप यांनी सांगितले. सासवड येथील भैरवनाथ मंदिरासमोर काही शेतकर्यांनी मिरवणूक काढल्या असून बैलजोडींचे स्वागत नीरा कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती नंदूकाका जगताप यांनी केले.
यावेळी ऋषी जगताप, देवस्थानचे पुजारी रामभाऊ भैरवकर, सुनील ताटे श्रीनिवास वढणे सचिन वढणे, अॅड. सौरभ वढणे, रोहन वढणे, ओम वढणे, श्रीनाथ वढणे, आकाश टिळेकर, अनिकेत टिळेकर, पप्पू कादबाणे व इतर उपस्थित होते.





