पंजाबमध्ये भाजप कार्यकर्त्यांना घरांबाहेर पडणेही मुश्किल; माजी मंत्र्याची व्यथा

चंडीगढ – केंद्रीय कृषी कायद्यांना शेतकऱ्यांकडून होणाऱ्या विरोधामुळे पंजाबमधील वातावरण ढवळून निघाले आहे. त्यामुळे त्या राज्यातील भाजप नेत्यांची मोठीच कोंडी होत असल्याचे समोर आले आहे. भाजप कार्यकर्त्यांना घरांबाहेर पडणेही मुश्किल बनल्याची व्यथा त्या पक्षाचे नेते आणि माजी मंत्री अनिल जोशी यांनी मांडली आहे.
भाजपच्या पंजाब शाखेने जोशी यांना काही दिवसांपूर्वी कारणे दाखवा नोटीस बजावली. तुम्ही (जोशी) सातत्याने केंद्र सरकार आणि भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाविरोधात वक्तव्ये करत आहात.
पक्षविरोधी कारवायांबद्दल तुमच्यावर शिस्तभंगाची कारवाई का केली जाऊ नये, अशी विचारणा त्या नोटिसीतून करण्यात आली. त्याला उत्तर देताना जोशी यांनी व्यथा मांडली. भाजपचे कार्यकर्ते पक्ष सोडून जात आहेत.
पक्ष वाचवण्याच्या उद्देशातून भूमिका मांडणे आणि शेतकऱ्यांविषयी बोलणे बेशिस्त आहे का, असा प्रतिसवाल त्यांनी प्रदेशाध्यक्ष अश्वनी शर्मा यांना विचारला आहे. मी कधीच केंद्रीय कृषी कायदे किंवा पक्षाच्या केंद्रीय नेत्यांविरोधात बोललो नाही.
कृषी कायद्यांविरोधात पंजाबमध्ये निदर्शने करणाऱ्या शेतकऱ्यांच्या प्रारंभी अतिशय मोजक्या मागण्या होत्या. त्याविषयीची योग्य माहिती भाजपच्या प्रदेश शाखेने केंद्रापर्यंत पोहचवली नाही. व्यवस्थित प्रयत्न केले असते तर प्रकरण योग्य प्रकारे हाताळता आले असते, असेही जोशींनी नमूद केले.
जोशी यांना बजावण्यात आलेली नोटीस आणि त्यांनी दिलेले उत्तर यामुळे पंजाब भाजपमधील अस्वस्थता चव्हाट्यावर आली आहे. कृषी कायदे मागे घेण्याच्या मागणीसाठी शेतकरी दिल्लीच्या सीमांवर सात महिन्यांपेक्षा अधिक कालावधीपासून आंदोलन करत आहेत. त्या आंदोलकांमध्ये पंजाबमधील शेतकऱ्यांची संख्या लक्षणीय आहे.





