पुणे – पहाटे थंडी, दुपारी उन्हाचा कवडसा आणि दिवसभर ढगाळ वातावरण अन पावसाची रिपरिप असे वातावरण शहरात पाहायला मिळाले. सोमवारी पुणेकरांनी उन्हाळा, पावसाळा आणि हिवाळा या तिन्ही ऋतूंचा अनुभव घेतला. सकाळी पावसाची सुरू झाल्याने पुणेकरांची चांगलीच तारांबळ उडाली.
ऐन डिसेंबरमध्ये पुण्यात पहाटे थंडी तर दिवसभर पावसाने हजेरी लावली. तर पहाटेपासून ढगाळ वातावरण आणि धुके पाहायला मिळाले. शहराच्या मध्यवर्ती भागासह उपनगरांत पावसाची रिपरिप दिवसभर सुरू होती.
याशिवाय दिवसभर वातावरणात गारवादेखील होता. यासह शहरातील रस्त्यांवर पाणी साचले होते. सोमवारी कामाचा दिवस असल्याने रस्त्यांवर गर्दी होती. अशातच पावसामुळे वाहनचालकांची तारांबळ उडाली.
पावसात वाहतूक कोंडीची भर
सोमवारी शहरात जलमय रस्ते, वाहने, रस्त्याकडेची उभी केलेली वाहने आणि बंद सिग्नल यामुळे वाहतूक कोंडीचे झाली. अनेकांनी पावसामुळे चारचाकी वापरण्यास प्राधान्य दिले. वाहनांची गर्दी असतानाच, त्यात अनेक रस्त्यांवर बंद सिग्नलची भर पडली होती. त्यामुळे वाहनांच्या रांगा लागल्या.
सोशल मीडियावरही “पाऊस’ व्हायरल
ऐन हिवाळ्यात पावसाने हजेरी लावल्याने, हा विषय सोशल मीडियावर व्हायरल झाला. “बाहेर पडताना रेनकोट वापरा’, “नक्की कोणता ऋतू आहे’, “पावसाळी सहल’, “पावसामुळे करोना कन्फ्युज’ असे मीम्स व्हायरल झाले.