येरवडा – शहरात होणाऱ्य जी-20 परिषदेच्या पार्श्वभूमीवर विमानतळ ते सेनापती बापट रस्त्यावर पालिकेकडून अभूतपूर्व कामे सुरू आहेत. मात्र, यात रस्ते चकाचक करण्याच्या नादात पथ विभाग काही चुकीची कामे करत असल्याचे प्रकार समोर आले आहेत. यात विमानतळासमोरील सिम्बायोसिस कॉलेज चौकात अशास्त्रीय पद्धतीने सर्कल आणि त्यात कांरजेही उभे करण्यात आले आहेत. यामुळे मात्र आता अपघाताची भीती निर्माण झाली आहे. अक्षरश: रस्त्याच्या मधोमध हे सर्कल साकारण्यात आले असून, त्याचा व्यास अंदाजे 10 ते 12 फूट आहे. हे सर्कल अपघाताला निमंत्रण देणार असून मोठी वाहने धडकून अपघाताची भीती आहे. सर्कलला वळताना वाहनांचा वेग कमी होत असला, तरी व वाहने अचानक समोरासमोर आल्याने अपघात होऊ शकतो. त्यामुळे हे सर्कल हटवावे, अशी मागणी वडगावशेरी नागरिक मंचाने केली आहे. भविष्यात या सर्कलमुळे अपघात झाल्यास महापालिका आयुक्तांविरोधात पोलिसांत तक्रार करायची काय? असा संतप्त सवाल सामाजिक कार्यकर्ते आशिष माने यांनी केला आहे. विशेष म्हणजे, हे सर्कल उभारताना वाहतूक विभागासही कळविण्यात आलेले नसल्याचे सांगण्यात येत आहे. आता हे सर्कल काढण्यासाठी संबंधित विभागाला कळविले आहे. तसेच लेखी पत्रही देण्यात येणार आहे. हे सर्कल उभारण्याचे वाहतूक नियोजन विभागाने सुचविलेले असून, मुख्य खात्याकडून या सर्कलची उभारणी खासगी संस्थेकडून केली जात आहे. या सर्कलमुळे वाहतुकीस अडथळा होत असेल, तर यावर पाहणी करुन जी-20 बैठकीनंतर निर्णय घेता येईल, असे प्रशासनाने म्हटले आहे. तर, हे सर्कल न काढल्यास आंदोलन करण्याचा इशारा मंचाने दिला आहे.