‘या’ देशात आता पोलिस दलातील ‘श्वान’ आणि ‘घोड्यांना’ही मिळणार ‘पेन्शन’

वॉरसा, दि. 27 – पोलिस दलांमध्ये कार्यरत असणाऱ्या श्वानांना आणि घोड्यांना निवृत्ती वेतन देण्याच्या प्रस्तावावर पोलंड देशातील सरकार आता विचार करीत आहे. सरकारी सेवेत असताना श्वानांच्या व घोड्यांच्या खाण्यापिण्याची चांगली काळजी घेतली जाते.
हे प्राणी कोणतेही वेतन न घेता सरकारी सेवेत राबत असतात. पण ते सेवेतून निवृत्त झाल्यानंतर मात्र त्यांची खूपच परवड होते. अशा प्रसंगी या प्राण्यांच्या मालकांना त्यांचा बोजा उचलावा लागतो. काही मालकांच्या दुर्लक्षामुळे या प्राण्यांची त्यांच्या आयुष्याच्या अखेरीला मोठीच परवड होते.
त्यामुळे त्या प्राण्यांनाही सरकारी नोकर समजून त्यांच्या निवृत्तीच्या किंवा म्हातारपणाच्या काळात त्यांच्या देखरेखीसाठी तरतूद करा आणि त्यांच्यासाठी पेन्शन लागू करा अशी मागणी पोलंड सरकारकडे काही प्राणीप्रेमींनी केली होती. त्याचा गांभीर्याने विचार करायचे तेथील सरकारने ठरवले आहे.
अंतर्गत सुरक्षा मंत्रालयाने या प्राण्यांना अशी मदत करण्याचा प्रस्ताव तयार केला असून त्या विषयीचा कायदा करण्याचा प्रस्ताव सरकारपुढे ठेवला आहे. त्याला लवकरच संमती मिळणार आहे. अंतर्गत सुरक्षामंत्री मारीसुझ कमिन्स्कीय यांनी म्हटले आहे की श्वानांनी सरकारी सेवेत अनेकांचे प्राण वाचवले आहेत आणि अनेक खतरनाक गुंडांना जेरबंद करण्यात मदत केली आहे.
घोड्यांचाही असाच चांगला वापर सरकारी सेवेत झाला आहे. सध्या पोलंडच्या सरकारी सेवेत 1200 श्वान आणि 60 घोडे आहेत. त्यातील दहा टक्के प्राणी दरवर्षी सेवानिवृत्त केले जातात, त्यांना पोलंड सरकारच्या नवीन कायद्याचा लाभ होईल आणि त्यांना शेवटपर्यंत सुखात खाता येईल असा विश्वास व्यक्त केला जात आहे.





