पिंपरी – आचारसंहिता लागताच राजकीय घडामोडींना वेग आला असून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे शहराध्यक्ष तुषार कामठे यांनी मंगळवारी (दि. १६) उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेतली. पक्षातर्फे त्यांनी महाविकास आघाडी म्हणून एकत्रित लढण्याचा प्रस्ताव दिला. त्याला पवारांनी सकारात्मक प्रतिसाद दिल्याचा दावाही त्यांनी केला. नेत्यांच्या पक्षप्रवेशाबरोबरच, पॅनल जुळवणी, युती-आघाडीचा निर्णय घेण्यासाठी बैठकांचे सत्र सुरू झाले आहे. मंगळवारी दिवसभर बारामती हॉस्टेलवर अजित पवार यांनी बैठका घेत रणनीती आखण्यास सुरूवात केली. त्यातच कामठे यांनी महाविकास आघाडीतून एकत्र लढण्याचा प्रस्ताव दिला. दोन्ही राष्ट्रवादी, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे, काँग्रेस, मनसे व रासप हे पक्ष एकत्रित येऊन आघाडीच्या माध्यमातून पिंपरी महापालिकेची निवडणूक लढवू. यामुळे भाजपाला रोखता येईल. त्यातून महापालिकेत सत्ता स्थापन करता येईल असे कामठे यांनी म्हटले आहे. तसेच कामठे यांनी विविध प्रभागांमधील मविआची ताकद, तुल्यबळ उमेदवारांची यादी, निवडणुकीची गणिते मांडली. अजित पवार यांच्याकडे एकत्रित लढण्याचा प्रस्ताव दिला आहे. दोन्ही राष्ट्रवादी एकाच विचाराचे आहेत. शाहू, फुले, आंबेडकर विचारांशी एकरुप असलेल्या पक्षासोबत नैसर्गिक आघाडी होईल. दोन्ही राष्ट्रवादी एकत्रित लढल्यास त्याचा फायदाच होईल. – तुषार कामठे, शहराध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष.