पिंपरी (प्रतिनिधी) – गेल्या काही दिवसांत शहरातील करोना रुग्ण मोठ्या प्रमाणात बरे होऊन आपल्या घरी परतले आहेत. आत्तापर्यंत 77 जणांनी करोनावर मात केली आहे. तर, 87 जणांवर उपचार सुरू आहेत.

शहरातील 77 करोनाबाधित रुग्णांवर शहरातील रूग्णालयांमध्ये उपचार सुरू आहेत. तर, 10 जणांवर शहराबाहेरील रुग्णालयांमध्ये उपचार सुरू आहे. अशा शहरातील एकूण 87 रुग्णांवर सध्या उपचार सुरू आहेत. शहरातील 77 जण करोनामुक्त झाल्याने त्यांना घरी सोडण्यात आले आहे. शहरातील आठ क्षेत्रीय कार्यालयांपैकी केवळ एका क्षेत्रीय कार्यालयातंर्गत येणारा परिसर वगळता इतर सर्व क्षेत्रीय कार्यालयांच्या हद्दीत “करोना’ने शिरकाव केला आहे. केवळ “ब’ क्षेत्रीय कार्यालयातंर्गत येणारा चिंचवड, रावेत, किवळे, मामुर्डी हा परिसर करोनामुक्त आहे. तर, अन्य 7 विभागांमध्ये करोनाबाधित रुग्ण आहेत.

शहरामध्ये सर्वाधिक 46 करोनाबाधित रुग्ण हे “फ’ क्षेत्रीय कार्यालयातंर्गत येणाऱ्या परिसरात आहे. त्यातील 16 रूग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. 2 रुग्णांचा मृत्यू झाला असून सध्या 28 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. तळवडे, रुपीनगर, त्रिवेणीनगर या भागाचा त्यामध्ये समावेश होतो. तर, ग क्षेत्रीय कार्यालयातंर्गत येणाऱ्या परिसरात आत्तापर्यंत एकूण 11 जणांना करोनाची लागण झालेली आहे. त्यातील 3 रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. तर, एका रुग्णाचा उपचार सुरू असताना मृत्यू झाला आहे. “ग’ क्षेत्रीय कार्यालयातंर्गत थेरगाव, काळेवाडी, पिंपरी, रहाटणी हा परिसर येतो. रुग्ण आढळलेल्या क्षेत्रीय कार्यालयांमध्ये अ क्षेत्रीय कार्यालयातंर्गत आत्तापर्यंत एकूण 10 रुग्ण आढळून आले आहे. त्यापैकी 1 रुग्ण बरा होऊन घरी परतला आहे. तर, 9 जणांवर उपचार सुरू आहेत.

जिल्हा रुग्णालयातून आणखी एक करोनामुक्त

सांगवी फाटा येथील जिल्हा रुग्णालयातून (औंध उरो रुग्णालय) आणखी एक रुग्ण करोनामुक्त झाला आहे. रुग्णालयातून आतापर्यंत एकूण 8 जणांना उपचार करून घरी सोडण्यात आले. तर, शनिवारी दुपारपर्यंत नव्याने 9 संशयित रुग्ण उपचारासाठी दाखल झाले. रुग्णालयामध्ये सद्य:स्थितीत 27 पॉझिटिव्ह रुग्णांवर उपचार सुरू आहेत. त्यातील 5 जण अतिदक्षता विभागात आहे. तर, आतापर्यंत तिघांचा करोनाने मृत्यू झाला आहे. दरम्यान, आज सोडण्यात आलेला 41 वर्षीय रुग्ण हा नेरे (ता. भोर) येथील आहे.