856 नव्या रुग्णांची भर; 1318 करोनामुक्त
पिंपरी – पिंपरी-चिंचवड शहरातील करोनाबाधितांची संख्या काही प्रमाणात कमी होत असली तरी मृत्यूचे प्रमाण मात्र प्रचंड वाढू लागले आहे. गेल्या 24 तासांत तब्बल 49 जणांचा मृत्यू झाला आहे. हा आजपर्यंतचा सर्वाधिक मृत्यूचा आकडा ठरला आहे. तर दिवसभरात नव्या 856 रुग्णांची भर पडली आहे. गेल्या पाच ते सहा दिवसांपासून बाधितांचा आकडा आठशेच्या आतमध्ये राहिला होता त्यामध्ये वाढ झाल्याने बाधितांचा आकडा आज 74 हजार 116 वर पोहोचला आहे.
गुरुवारी प्रतीक्षेत असलेल्या रुग्णांचा अहवाल आज (शुक्रवारी) महापालिकेला प्राप्त झाला. आजच्या अहवालानुसार शहरातील 854 जणांना करोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे बाधितांची संख्या 74 हजार 116 इतकी झाली आहे. तर गेल्या 24 तासांत 49 जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामध्ये 23 जण शहरातील असून, 26 जण शहराबाहेरील आहेत. त्यामुळे शहरातील मृतांचा आकडा 1229 वर पोहोचला असून शहराबाहेरील 438 जणांचा मृत्यू झाल्याने मृत्यूच्या आकड्याने 1667 ची संख्या
आज गाठली.
गेल्या 24 तासांत मृत्यू झालेल्यांमध्ये शहरातील रहाटणी, नेहरूनगर, खराळवाडी, वाकड, पिंपळे गुरव, थेरगाव, काळेवाडी, दिघी, चिंचवड, कुदळवाडी, भोसरी, आकुर्डी, निगडी, पिंपळे निलख येथील 23 जणांचा समावेश आहे.
तर शहराबाहेरील शिवणे, पुणे, सिंहगडरोड, चाकण, आंबेगाव, धायरी, खेड, सोमाटणे फाटा, कोल्हापूर, सातारा, लोणीकंद, शिरुर, बार्शी, नाराणगाव, बालेवाडी, कात्रज, जुन्नर, खडकीबाजार येथील 26 जणांचा समावेश आहे. आतापर्यंत शहरातील 60 हजार 764 जण करोनामुक्त झाले असून, शहराबाहेरील 4368 जणांनी करोनावर यशस्वी मात केली आहे. आज दिवसभरात करोनाची कोणतीही लक्षणे न आढळल्यामुळे 1318 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.