उत्तर भारतात पावसाने रौद्रावतार! आतापर्यंत पंधरा जणांचा मृत्यू; जम्मू-काश्मीर, लडाख आणि हिमाचल प्रदेशमध्ये रेड अलर्ट जारी

नवी दिल्ली : देशात सध्या पावसाने हाहाकार घातला आहे. विशेषतः उत्तर भारतात पावसाचा तांडव पाहायला मिळत आहे. हिमाचल प्रदेश, दिल्ली, जम्मू-काश्मीर, पंजाबसह उत्तरेकडील राज्यांमध्ये वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस कोसळल्याने याठिकाणचे जनजीवन पूर्णपणे विस्कळित झाले आहे. पावसामुळे विविध ठिकाणी झालेल्या भूस्खलनामुळे, दरडी कोसळल्यामुळे त्यासोबतच नद्यांना आलेल्या पुरामुळे आतापर्यंत जवळपास १५ जणांना आपले प्राण गमवावे लागले आहेत.
#WATCH | Himachal Pradesh | Latest visuals from Mandi around Victoria Bridge, Panchvakhtra Temple and another bridge that has been damaged following incessant heavy rainfall. pic.twitter.com/8gKOfbvfKT
— ANI (@ANI) July 10, 2023
हिमाचल प्रदेशात मुसळधार पावसामुळे नद्यांनी रौद्ररूप धारण केले असून राज्यातील सात शहरांना अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला होता. यापैकी, तीन वेगवेगळ्या ठिकाणी झालेल्या भूस्खलनाच्या घटनांमध्ये पाच जणांचा मृत्यू झाल्याची माहिती प्रशासनाच्या वतीने देण्यात आली. सात भूस्खलनाच्या १४ घटना घडल्या असून १३ ठिकाणी पूरसदृश स्थिती निर्माण झाल्यामुळे सुमारे ७०० रस्ते बंद करण्यात आल्याची माहिती प्रशासनाने दिली. त्याचप्रमाणे मनाली येथे पूरसदृश स्थितीमुळे काही दुकाने वाहून गेली आहेत, तर कुलूसह काही शहरांत आलेल्या पुरामुळे वाहने वाहून गेल्याचे स्थानिक प्रशासनाने सांगितले.
#WATCH | Under the impact of incessant rainfall in Himachal Pradesh, Lagghati Khad in Kullu swells.
Visuals near Kullu Bus Stand. pic.twitter.com/Vt8ul1rU4u
— ANI (@ANI) July 10, 2023
दरम्यान, उत्तराखंड मधील ऋषीकेश-बद्रिनाथ राष्ट्रीय महामार्गावर झालेल्या भूस्खलनामुले भाविकांची मोटार दरीत कोसळल्याने तीन जणांचा मृत्यू झाला आहे. या मोटारीमध्ये एकूण ११ जण होते त्यापैकी पाच जणांना वाचविण्यात यश आले असल्याची माहिती राज्य आपत्ती प्रतिसाद दलाच्या वतीने देण्यात आली. दिल्ली आणि गुरुग्रामसह उत्तरेकडील राज्यांतील अनेक शहरांत रविवारी रस्त्यांवर पाणी आल्यामुळे वाहतूक विस्कळित झाली असून, अनेक वाहने अडकून पडली आहेत. रेल्वेच्या वाहतुकीवर देखील मुसळधार पावसाचा परिणाम झाला आहे. उत्तर रेल्वे प्रशासनाच्या वतीने देण्यात आलेल्या माहितीनुसार, रविवारी १७ रेल्वे गाड्या रद्द करण्यात आल्या, तर १२ रेल्वे गाड्यांचे मार्ग बदलण्यात आले.
#WATCH | Delhi: Water level rises in Yamuna river, following heavy rainfall in the region. pic.twitter.com/4qKTJwgMjP
— ANI (@ANI) July 10, 2023
तर तिकडे मुसळधार पावसामुळे जम्मू-काश्मीर, लडाख आणि हिमाचल प्रदेशमधील अनेक शहरांना रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. त्यासोबतच पंजाब आणि हरियानामधील अनेक शहरांमध्ये रविवारी मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळित झाले. हरियानामध्ये मार्कंडा, घग्गर आणि टांगरी या नद्यांच्या पाणीपातळीत वाढ झाल्याने सरकारच्या वतीने पूरनियंत्रण कक्षांची स्थापना करण्यात आली आहे. गुरुग्राम येथे मुसळधार पावसामुळे रस्त्यावर पाणी साचल्याने येथील वाहतुकीवर परिणाम झाला. राजस्थान आणि उत्तर प्रदेशातील अनेक शहरांतही मुसळधार पाऊस झाला असून काही शहरांना रेड अलर्ट तर काही शहरांना यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.





