सातारा: “महाराष्ट्रात फक्त आणि फक्त मराठी भाषेचीच सक्ती आहे आणि तीच कायम राहील. परदेशी भाषांचे स्वागत करताना आपल्याच देशातील इतर भाषांना विरोध करणे योग्य नाही. सर्व भाषांचा सन्मान व्हावा, मात्र मातृभाषेचा दर्जा सर्वोच्च असला पाहिजे,” असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी येथे केले. साताऱ्यात आयोजित 99व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे उद्घाटन मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते झाले, त्यावेळी ते बोलत होते. साहित्यातील राजकीय हस्तक्षेपावर भाष्य संमेलनाच्या व्यासपीठावरून बोलताना मुख्यमंत्र्यांनी भाषा, संस्कृती आणि राजकारण अशा विविध विषयांवर भाष्य केले. मावळत्या अध्यक्षांनी नव्या अध्यक्षांकडे सूत्रे सोपवण्याच्या प्रक्रियेचे कौतुक करताना ते मिश्किलपणे म्हणाले, “साहित्य क्षेत्रात ज्याप्रमाणे आनंदाने पदभार सोपवला जातो, तसे राजकारणातही झाले तर किती चांगले होईल. मी मुख्यमंत्री असेपर्यंत साहित्यात कोणताही राजकीय हस्तक्षेप होणार नाही. साहित्यिकांनी राजकारणात जरूर यावे, पण साहित्यात राजकारण आणू नये.” मराठीला मिळालेल्या अभिजात भाषेच्या दर्जाबद्दल बोलताना मुख्यमंत्री म्हणाले की, पंतप्रधान मोदींनी मराठीचा संघर्ष समजून घेतला आणि तिला राजमान्यता दिली. आता ही भाषा जगभरात पोहोचवण्यासाठी सरकार प्रयत्नशील आहे. ‘त्रिभाषा सूत्रा’बाबत स्पष्टीकरण देताना त्यांनी सांगितले की, पहिलीपासून भाषा सक्तीबाबत डॉ. नरेंद्र जाधव यांची समिती अहवाल सादर करेल, त्यानंतर योग्य निर्णय घेतला जाईल. मात्र, इंग्रजी, फ्रेंच किंवा स्पॅनिश यांसारख्या परदेशी भाषांचे कौतुक करताना भारतीय भाषांविषयी दुजाभाव ठेवू नये, अशी भूमिका त्यांनी मांडली. साताऱ्याच्या भूमीचे कौतुक करताना मुख्यमंत्री म्हणाले की, सातारा हा केवळ भौगोलिक प्रदेश नसून विचारांचा संगम आहे. साताऱ्याने आजवर सर्वाधिक १७ संमेलनाध्यक्ष दिले आहेत. ५० वर्षांपूर्वी आणीबाणीच्या काळात दुर्गाबाई भागवत यांनी याच भूमीतून अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा जो हुंकार दिला होता, त्याची आठवण करून देत त्यांनी संविधानाच्या मजबूतीवर विश्वास व्यक्त केला. “जोवर चंद्र-सूर्य आहेत, तोवर मराठीचा अभिमान कायम राहील,” असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. भाषणादरम्यान मुख्यमंत्र्यांनी एक वैयक्तिक खुलासा करत उपस्थितांची माफी मागितली. महानगरपालिका निवडणुकीसाठी अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस असल्याने, बंडखोर उमेदवारांची मनधरणी करण्यासाठी त्यांना व्यासपीठावर वारंवार फोन वापरावे लागले. “मी फोनवर असलो तरी माझे लक्ष इथल्या प्रत्येक शब्दाकडे होते,” असे त्यांनी सांगितले. यावेळी मावळत्या अध्यक्षा डॉ. तारा भवाळकर यांनी नूतन अध्यक्ष विश्वास पाटील यांच्याकडे संमेलनाची सूत्रे सुपूर्द केली. या सोहळ्याला साहित्यातील दिग्गज आणि मोठ्या संख्येने रसिक उपस्थित होते.