कोरेगावात पाच उमेदवारांचे अर्ज अवैध, तीन उमेदवारांच्या अर्जावरील आक्षेप फेटाळले

कोरेगाव – विधानसभा मतदारसंघातील निवडणुकीसाठी ३२ उमेदवारांनी ४४ अर्ज दाखल केले होते. बुधवारी अर्जांची छाननी प्रक्रिया राबविण्यात आली. त्यामध्ये पाच उमेदवारांचे अर्ज बाद ठरविण्यात आले. अन्य नाम साधर्म्य असलेल्या तीन उमेदवारांच्या अर्जावर आक्षेप घेण्यात आले होते. वकिलांनी त्यासाठी जोरदार युक्तिवाद देखील केला, मात्र निवडणूक निर्णय अधिकारी तथा प्रांताधिकारी अभिजित नाईक यांनी सर्व आक्षेप फेटाळत तिन्ही अर्ज वैध ठरविले.
कोरेगाव हा पश्चिम महाराष्ट्रातील हाय व्होलटेज मतदारसंघ म्हणून ओळखला जातो, यावेळेस तब्बल ३२ उमेदवारांनी ४४ अर्ज दाखल केल्याने निवडणुकीत रंगत येण्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्याचबरोबर दोन्ही आमदारांच्या नावाशी साम्य असलेल्या चार जणांनी अर्ज दाखल केले होते. त्यामुळे छाननी प्रक्रियेकडे सर्वांचेच लक्ष लागून राहिले होते.
निवडणूक निर्णय अधिकारी तथा प्रांताधिकारी अभिजित नाईक यांनी बरोबर ११ वाजता सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी तथा तहसीलदार डॉ. संगमेश कोडे, निवडणूक नायब तहसीलदार सारिका शिंदे, महसूल सहाय्यक रवींद्र किर्वे यांच्या उपस्थितीत छाननी प्रक्रिया सुरु केली. काही उमेदवार स्वत: उपस्थित होते, तर काही जणांचे प्रतिनिधी आणि वकील उपस्थित होते. सुरुवातीला छाननीमध्ये पक्षाचे अधिकृत ए. बी. फॉर्म नसणे यासह तांत्रिक बाबींमुळे जालिंदर गोडसे यांचे दोन अर्ज, ज्योत्सना निलेश शिंदे, शुभांगी दिलीप जगताप, प्रकाश तानाजी जाधव व मनिषा संजय सोनावणे यांचे प्रत्येकी एक उमेदवारी अर्ज देखील तांत्रिक कारणास्तव बाद ठरविण्यात आले.
अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज दाखल केलेल्या शशिकांत धर्माजी शिंदे, महेश संभाजी शिंदे व महेश सखाराम शिंदे यांच्या अर्जांवर आक्षेप घेण्यात आले. त्यावर वकिलांनी जोरदार युक्तिवाद केला. ऍड. प्रशांत पाटील, ऍड. श्रीनिवास मुळे, ऍड. पांडुरंग भोसले, ऍड. अनिकेत बोबडे व ऍड. सौरभ बर्गे यांनी आवश्यक कागदपत्रे सादर करत युक्तिवाद केला. निवडणूक निर्णय अधिकारी अभिजित नाईक यांनी तीन्ही उमेदवारांवर घेण्यात आलेले आक्षेप फेटाळून लावत त्यांचे अर्ज कायम केले आहेत.





