कोल्हापूर – स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाने विक्रमनगर आणि कसबा तारळे येथील चौघा चोरट्यांना अटक करुन 12 मोटारसायकली, एक कार हस्तगत केली. तसेच एक चोरीचा गुन्हाही उघडकीस आणला.
सचिन शिवाजी आगलावे (वय 21), राहूल उमेश चौधरी (26 दोघे रा. रा. तिसरी गल्ली, शाहू कॉलनी, विक्रमनगर), ऋषिकेश कृष्णात कुकडे (22), दीपक आनंदा सूर्यवंशी (22, रा. माळ भाग, बुरुड गल्ली, कसबा तारळे, ता. राधानगरी) अशी संशयितांची नावे आहेत.
स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलिस नाईक तुकाराम राजिगिरे आणि संदीप कुंभार यांना रेकॉर्डवरील गुन्हेगार सचिन आगलावे व त्याचे सहकारी नंबर प्लेट नसलेली सोनेरी रंगाची मारुती 800 ही कार पुणे बेंगलोर महामार्गावर उचगाव येथे येणार असल्याची माहिती मिळाली होती.
त्यानंतर सहाय्यक पोलिस निरीक्षक सत्यराज घुले, उप निरीक्षक विनायक सपाटे, हवालदार तुकाराम राजिगिरे, सुनील कवळेकर, अशोक कोळेकर, अजित वाडेकर, पांडुरंग पाटील, नितीन चोथे, संदीप कुंभार, सागर कांडगावे, महेश गवळी, ओकार परब यांनी महामार्गावर सापळा रचला. त्यांनी सचिन आगलावे याच्याकडे असलेली कार ताब्यात घेतली.
तसेच सचिन, राहूल चौधरी, ऋषिकेश कुकडे, दीपक सूर्यवंशी यांना ताब्यात घेतले. पोलिसांनी त्यांच्याकडे चौकशी केली असताना त्यांनी 12 मोटार सायकली आणि एक कार चोरल्याची कबुली दिली.